वाळके खूनप्रकरणातील तिघा संशयितांना १ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

मडगावातील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणातील तिघेही संशयित मुस्तफा शेख, ओमकार पाटील व एव्हेंडर रॉड्रिग्ज याची आज मडगाव न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पणजी: मडगावातील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणातील तिघेही संशयित मुस्तफा शेख, ओमकार पाटील व एव्हेंडर रॉड्रिग्ज याची आज मडगाव न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या तिघांविरुद्ध पणजी, हणजूण तसेच आगशी पोलिस स्थानकात चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. 

वाळके यांचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल बिहार येथून खरेदी करण्यात आले होते त्यामुळे सीआयडी क्राईम ब्रँचचे पथक येत्या काही दिवसांत बिहारला जाणार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी दिली. 

दोनापावल येथील जेटीवरून गाडी चोरल्याप्रकरणी पोलिस स्थानकात एव्हेंडर रॉड्रिग्ज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गाडी वाळके यांच्या ज्वेलरी दुकानासमोर चोरी केल्यानंतर पळून जाण्यासाठी आणून ठेवण्यात आली होती. हणजूण येथील पोलिस स्थानकात एव्हेंडर रॉड्रिग्ज व ओमकार पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच आगशी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखला आहे. त्यामुळे या तिघा संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली असली तरी या विविध पोलिस स्थानकातील गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे. 

दरम्यान, वाळके खून प्रकरणाशी संबंधित एडिसन गोन्साल्विस यालाही ताब्यात घेऊन मडगाव पोलिसांनी चौकशी केली होती. त्याला साक्षीदार करण्यासाठी त्याची जबानी नोंदवून सोडून देण्यात आले होते. मात्र त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. क्राईम ब्रँचने दाखल केलेल्या उत्तरात त्याला साक्षीदार म्हणून मडगाव पोलिसांनी जबानी नोंदवून घेतल्यानंतर त्याची कोठडीची गरज नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या