स्वप्नील वाळके खून प्रकरण: एव्हेंडर रॉड्रिग्जकडून मुस्तफा शेखला चोरीची सुपारी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

मंगळवारी दिवसभरात क्राईम ब्रँचच्या पथकाने संशयित ओमकार पाटील याने घटनेच्या दिवशी वापरलेले कपडे घरातच लपवून ठेवले होते ते त्याच्या उपस्थितीत जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त आणखी दुचाकी जप्त करण्यात आली.

पणजी: मडगावातील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांचा खून जबरी  चोरीच्‍या कटातून झाल्याचे आतापर्यंत केलेल्या तपासात उघड झाले आहे. वाळके यांच्या दुकानात चोरी करण्यापूर्वी पाजीफोंड - मडगावातील एक सराफी दुकान लक्ष्य केले होते. मात्र, दुकानात एकापेक्षा अधिक व्यक्ती असल्याने या टोळीने निर्णय ऐनवेळी बदलला. त्यानंतर वाळके यांच्या दुकानावर चोरी करण्याची सुपारी संशयित एव्हेंडर रॉड्रिग्ज याने संशयित मुस्तफा शेख याला दिली. त्यामुळे या घटनेमागील मास्टरमाईंड एव्हेंडर रॉड्रिग्ज असल्‍याची माहिती तपासात उघड झाल्याचे क्राईम ब्रँचच्या सूत्राने सांगितले. 

मंगळवारी दिवसभरात क्राईम ब्रँचच्या पथकाने संशयित ओमकार पाटील याने घटनेच्या दिवशी वापरलेले कपडे घरातच लपवून ठेवले होते ते त्याच्या उपस्थितीत जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त आणखी दुचाकी जप्त करण्यात आली. घटनेच्या दिवशी कृष्णी ज्वेलर्स दुकानाच्या बाहेर मोबाईलवरून ज्या व्यक्तीने चित्रीकरण केले होते ती क्लिप ताब्यात घेण्यात आली आहे. याशिवाय तेथे उपस्थित असलेल्या ८ ते १० जणांच्या जबान्या नोंदवून घेण्यात आल्या. आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये व जमा केलेल्या पुराव्याआधारे हा जबरी चोरीचाच प्रकार असल्याचे आढळून येत आहे. वाळके यांच्या कुटुंबियांनीही हा चोरीचाच प्रकार असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

चार दिवसांपासून होते पाळतीवर!
पाजीफोंड - मडगाव येथील एका सराफी दुकानात चोरी करण्यासाठी तेथे रेकी केली होती. मात्र, दुकान खुले असताना तसेच दुकान बंद करतानाही एकापेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित असल्याने हे लक्ष्य रद्द केले होते. त्यानंतर वाळके यांच्या दुकानात घटनेच्या चार दिवस आधी मुस्तफा व एव्हेंडर हे रेकी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी वाळके यांना हातातील सोन्याचा कडा करण्यासाठी किती खर्च येईल याची माहिती घेतली होती. त्यांनी त्यासाठी २ लाख ८० हजार रुपये लागतील असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी या दुकानात वाळके यांना पिस्तुलाचा धाक दाखवून चोरी करण्याचा पूर्वनियोजित कट आखला.

संशयित मुस्तफा शेख याला मनुष्यवधाच्या गुन्हाप्रकरणी शिक्षा झाली होती ती भोगून काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता तर इतर दोघे संशयित ओमकार पाटील व एव्हेंडर रॉड्रिग्ज हे चोऱ्या व फसवणुकीच्या गुन्ह्यात गुंतलेले आहेत. एव्हेंडर याने अनेकांनात पोर्तुगीज पासपोर्ट बनवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना लुबाडले आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांत तक्रार दाखल आहे. त्याच्याविरुद्ध आगशी व पणजी पोलिस स्थानकातही गुन्हे नोंद असल्याने खून प्रकरणातील पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना इतर गुन्ह्यांमध्ये अटक होणार आहे. 

मुस्तफासह तिघांना पणजी पोलिस घेणार ताब्यात
दोनापावल येथून गाडीच्या चोरीप्रकरणी संशयित मुस्तफा शेख, एव्हेंडर रॉड्रिग्ज तसेच ओमकार पाटील या तिघांनाही क्राईम ब्रँचचा तपास पूर्ण झाल्यावर ताब्यात घेण्यात येणार आहे. पणजी पोलिस स्थानकात मडगाव खून प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाडीच्या मालकाने चोरीची तक्रार दिली असल्याची माहिती पणजी पोलिस स्थानकाचा ताबा असलेल्या निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी आज दिली. 

असा रचला कट!
मडगाव येथे कृष्णी ज्वेलर्स दुकानात चोरी करण्यासाठी पूर्वनियोजित कटानुसार मुस्तफा, ओमकार व एव्हेंडर हे तिघेही सकाळी १० वाजता चोरलेल्या गाडीने आले व ती या दुकानासमोर उभी केली. चोरी केल्यानंतर या गाडीने पसार होण्याचा त्यांचा बेत होता. त्यानंतर हे तिघेही परतले. मुस्तफा हा मडगावातील आपल्‍या घरी गेला तर एव्हेंडर व ओमकार हे दुचाकीने पणजीत आले. त्यांनी आणखी दुचाकी घेऊन मडगाव आले व त्याची माहिती मुस्तफाला दिली. पिस्तुल तसेच चाकू संशयित एव्हेंडर याने मुस्तफाला पुरविला होता. चोरी करण्यास दुकानात जाण्याची जबाबदारी मुस्तफावर सोपविण्यात आली होती, तर ओमकार व एव्हेंडर हे दुकानाबाहेर त्याची वाट पाहत थांबणार होते. ठरलेल्या नियोजनानुसार मुस्तफा दुकानात घुसला. चोरीचा प्रयत्न वाळकेच्या धाडसामुळे फसला. मात्र, त्याच्यावर मुस्तफाने पिस्तुलाने झाडलेल्या गोळीमुळे मृत्यू झाला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या