स्विमिंग पुलाची घोषणा हवेतच

swimming pool
swimming pool

मुरगाव

बेलाबाय येथील नापिक शेत जमीनीत गोवा शिपयार्डमधील गाळ मिश्रित माती टाकून तो परिसर सपाट केल्यानंतर त्या जागेत गोवा शिपयार्डने जाहीर केलेल्या १० कोटी रुपयांतून स्विमिंग पूल उभारला जाईल, अशी घोषणा करुन चार वर्षे उलटली तरी अद्याप स्विमिंग पूल नाहीच उलट गोवा शिपयार्डचे ते १० कोटी रुपये कुठे गेले याचा थांगपत्ता नाही.
या स्विमिंग पूल घोषणेची सर्वत्र टिंगल केली जात आहे. गोवा शिपयार्डच्या प्रशासकीय इमारतीचे काम चालू आहे. ही इमारत भू मजला खोदून उभारण्यात आली आहे. यामुळे शिपयार्डात प्रचंड प्रमाणात गाळ मिश्रित माती निर्माण झाली होती. तिची विल्हेवाट कुठे करावी हा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा बेलाबाय येथील पडिक शेत जमिनीत ती सर्व माती टाकून सपाटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सपाटीकरण केलेल्या जमिनीत वास्कोकरांसाठी स्विमिंग पूल गोवा शिपयार्डकडून १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे वास्कोतील जनतेने या घोषणेचे स्वागत केले पण आजपावेतो स्विमिंग पूलसाठी कोणतीही हालचाल केली जात नसल्याने लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
दरम्यान, मातीचा भराव टाकून सपाटीकरण केलेल्या जमिनीत स्विमिंग पूल बांधल्यास भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाने निदर्शनास आणून देऊन या प्रकल्पाला विरोध दर्शविला. त्यामुळे स्विमिंग पूलचा ध्यास सोडून बेलाबायच्या त्या जागेत शाळांच्या इमारती उभारण्याची घोषणा करण्यात आली. तेही शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यावर क्रीडा मैदान उभारण्यात येईल, असे गाजर पुढे केले पण, आतापर्यंत कोणताच प्रकल्प त्या जागेत उभारण्याची हालचाल होत नाही.
आपल्या क्षेत्रातील गाळ मिश्रित माती टाकलेल्या पडिक शेत जमीनीत १० कोटी रुपये खर्चून स्विमिंग पूल उभारण्याची तयारी दर्शविलेल्या गोवा शिपयार्डने सुद्धा आपले काम फत्ते झाल्यावर आता या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गोवा शिपयार्डने जाहीर केलेले १० कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल वास्कोतील जनता विचारीत आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com