
Wine Flu Infection Is Increasing In Goa: प्राथमिक आरोग्य केंद्रे, दोन्ही जिल्हा इस्पितळे आणि गोमेकॉत सर्दी- तापाच्या रुग्णांची संख्या सध्या वाढत चालली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जिथे सरासरी तिसेक रुग्ण तपासणीसाठी येत होते, तेथे ही संख्या 70 च्या पुढे गेल्याची माहिती मिळाली आहे.
रक्त तपासणी करून घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण यात मोठे आहे. सध्या ऊन-पावसाच्या लपंडावामुळे हवामानात होत असलेला बदल या आजाराला कारणीभूत ठरत आहे. राज्यात स्वाईन फ्लू (एच-३ एन-२) या विषाणूचा संसर्ग पसरत असल्याचे दिसून आले आहे.
सरकारी पातळीवर हा साधा सर्दी-तापाचा आजार आहे, असे सांगण्यात येत असले तरी राज्यात सध्या स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडू लागल्याची पुष्टी खासगी इस्पितळातून होऊ लागली आहे.
याबाबत मणिपाल इस्पितळातील डॉ. मिलींद नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सहआजार असलेल्यांसाठी हा फ्लू गंभीर आहे. त्यावर उपचार आहेत; पण रुग्णांना त्याचा त्रास जाणवतो.
पूर्वी ‘एच-३ एन-१’ प्रकारचा विषाणू होता, त्यात आता बदल होऊन ‘एच-३ एन-२’ प्रकारचा विषाणू पसरत आहे. लहान मुलांना ताप- सर्दी आधी होते, मग कुटुंबात ती पसरते.
काय काळजी घ्यावी?
डॉ. नाईक त्यांनी सांगितले की, मधुमेही, दम्याचा विकार असलेल्यांनी या नव्या विषाणूपासून स्वत:ला जपले पाहिजे. साधी सर्दी झाली म्हणून आजार अंगावर काढू नये.
तपासणी करून घेऊन सर्दी कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अंगदुखी, नाक चोंदणे अशी लक्षणे या आजारात सुरवातीला आढळतात, असे त्यांनी सांगितले.
स्वच्छतेला प्राधान्य
गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले की, पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. नागरिकांनी स्वतःचे घर आणि सोसायटी परिसरात डासांची उत्पत्ती होऊ नये, याची दक्षता घ्यावी.
"सध्या सर्दी-पडशाचे आजार वाढले असले तरी कोविड आणि ‘एच-१ एन-१’चे रुग्ण वाढलेले नाहीत. लोकांनी घाबरून जाऊ नये. सर्दी-तापाची लक्षणे दिसल्यावर नजीकच्या आरोग्य केंद्र वा इस्पितळात उपचार घेणे आवश्यक आहे."
- डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोमेकॉ.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.