मामलेदार कोविड व्यवस्थापनात व्यग्र; कूळ - मुंडकार प्रकरणे सुनावणी तूर्त स्थगित

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

तिसवाडी तालुक्यात ऑगस्टअखेरीपर्यंत कूळ व मुंडकाराची १२०० प्रकरणे प्रलंबित आहेत, तर ३७० म्युटेशन प्रकरणांपैकी टाळेबंदी काळात ८० प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. 

पणजी: ‘कोविड - १९’च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात यावर्षी मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू झाल्यापासून कूळ व मुंडकार प्रकरणे सुनावणी पूर्ण ठप्प झाली आहे. कोविड व्यवस्थापनाच्या कामात विविध तालुक्यातील मामलेदार हे व्यग्र असल्याने ही सुनावणी बंद ठेवण्यात आली आहे. तिसवाडी तालुक्यात ऑगस्टअखेरीपर्यंत कूळ व मुंडकाराची १२०० प्रकरणे प्रलंबित आहेत, तर ३७० म्युटेशन प्रकरणांपैकी टाळेबंदी काळात ८० प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. 

काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने कूळ व मुंडकार प्रकरणांवरील सुनावणी वेळेत पूर्ण व्हाव्यात, यासाठी मामलेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या मामलेदारांकडे या सुनावणीव्यतिरिक्त इतरत्र कामे सोपविली जात असल्याने दिवसेंदिवस प्रकरणांची संख्या वाढत आहे. राज्यात कोविड व्यवस्थापनासाठी गेल्या मार्च महिन्यापासून मामलेदारांकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्याने ते कार्यालयीन कामकाजात वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने कूळ - मुंडकार प्रकरणे सुनावणी तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुनावणी बंद असल्याने काही अर्जदारांना त्याची काही प्रमाणात झळ बसली आहे.

कोविड महामारीमुळे अर्जदार फिरकलेच नाहीत...
तिसवाडी तालुक्यात पाच मतदारसंघ आहेत व या तालुक्यासाठी सहा मामलेदार आहेत. प्रत्येकाला एक किंवा दोन मतदारसंघामधील कूळ व मुंडकार तसेच म्युटेशन प्रकरणे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आली आहेत. राज्यात टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी तिसवाडीमध्ये मुंडकारची ५७० प्रकरणे, कुळाची ५३० प्रकरणे प्रलंबित होती. आता ऑगस्टपर्यंत मुंडकार प्रकरणे ५८० तर कूळ प्रकरणे ५४० झाली आहेत. या गेल्या सहा महिन्यात कूळ व मुंडकारची प्रत्येकी दहा प्रकरणे वाढली आहे. या प्रकरणांवरील सुनावणीवेळी दोन्ही बाजू ऐकून घ्यावी लागते. मात्र, कोविड मार्गदर्शक सूचनांमुळे सामाजिक अंतराच्या अटीमुळे या प्रकरणांची सुनावणी घेतली जात नसल्याने कोणीही अर्जदार महामारीमुळे फिरकलेही नाहीत.

तिसवाडीत सध्या २९० म्युटेशनची प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र, या प्रकरणातील अर्जदार संपर्कही साधत नाहीत. 

कामकाज रखडले?
कूळ व मुंडकार प्रकरणी म्युटेशनची ३०० प्रकरणे होती ती ३७० वर पोहचली आहेत. मात्र, त्यातील ८० प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. गेल्या मार्चपासून कोविड आस्थापन कायद्याखाली अनेक जबाबदाऱ्या मामलेदारांवर सोपविल्या आहेत. त्यामुळे कार्यालयातील काही महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त इतर कामे सध्या बाजूला ठेवण्यात आली आहेत. टाळेबंदी काळात अडकून पडलेल्या परप्रांतियांची वाहतूक व्यवस्था, निवारा, त्यांना धान्यसाठा पुरवठा करणे, अलगीकरणात असलेल्यांना मदत करणे, विलगीकरण केंद्र यासारखी कामे हाताळावी लागल्याने कार्यालयातील कामकाजाकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या