केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

Tukaram Sawant
रविवार, 2 ऑगस्ट 2020

समाजातील दुर्बल घटकांना केंद्रबिंदू ठरवून केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजनांना चालना दिली असून लाखो जनता या योजनांचा लाभ घेत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगून गरीब घटकांच्या कल्याणार्थ अंमलात आणलेल्या या योजनांबरोबर राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यास जनतेने पुढे यावे, असे आवाहन केले.

डिचोली

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर आणि गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शनिवारी साखळी येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
‘कोविड-१९’ महामारीचा प्रतिकार करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न जारी आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यांनी यावेळी सांगितले. जनतेने योग्य ती खबरदारी घेतल्यास कोरोना महामारीपासून भीती बाळगण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत पदपथ विक्रेत्यांना सामावून घेण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी साखळी पालिकेच्या मुख्याधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मामलेदार श्री. पंडित यांचे अभिनंदन केले.
डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने मामलेदार कार्यालयातर्फे साखळीच्या रवींद्र भवनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर, नगरसेवक ब्रम्हानंद देसाई, आनंद काणेकर, रश्‍मी देसाई, शुभदा सावईकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, जीएसआयडीसीचे संचालक विशांत चिमुलकर, अन्य अधिकारी तसेच विविध पंचायतींचे सरपंच आणि पंच सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आत्मनिर्भर आणि गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभधारकांना कडधान्य वितरीत करण्यात आले.
मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी आपल्या स्वागतपर भाषणात मार्च २०२० पासून केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर आणि गरीब कल्याण अन्न योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. ‘कोविड-१९’ महामारीचा यशस्वीपणे सामना करीत असल्याबद्दल उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे अभिनंदन केले. तलाठी अजित गावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जागृती वाहनाचा शुभारंभ
या कार्यक्रमाला जोडून उत्तर गोवा जिल्हाधिकारी प्रशासनातर्फे तैनात करण्यात आलेल्या ‘कोविड-१९’ महामारी विरोधी जागृती वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बावटा दाखवून या वाहनाचा शुभारंभ केला. ‘कोविड-१९’ महामारीच्या संकटाचा प्रतिकार करण्यासाठी या वाहनातून जागृती करण्यात येणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी तसेच कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास कोणती खबरदारी घ्यावी. आदी उपयुक्‍त माहिती या जागृती वाहनातून देण्यात येणार आहे. या वाहनातून संपूर्ण उत्तर गोव्यात जागृती करण्यात येणार आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या