कोरोनाची भीती दूर करा, सर्वांना धीर द्या

Tukaram Govekar
शुक्रवार, 31 जुलै 2020

कोरोनासंबंधी लोकांनी आपल्या मनातील भीती दूर करून कोरोना संक्रमित रुग्णांना धीर देण्याची गरज आहे. आपल्या घरातील ज्‍येष्‍ठांना व मधुमेह असलेल्या कुटुंबातील सदस्‍यांची काळजी घ्या, असा सल्ला गोमेकॉचे न्याय वैद्यकीय सुविधा सहयोगी प्राध्यापक डॉ. मधू घोडकिरेकर यांनी दिला.

तुकाराम गोवेकर

नावेली :

कोरोनासंबंधी लोकांनी आपल्या मनातील भीती दूर करून कोरोना संक्रमित रुग्णांना धीर देण्याची गरज आहे. आपल्या घरातील ज्‍येष्‍ठांना व मधुमेह असलेल्या कुटुंबातील सदस्‍यांची काळजी घ्या, असा सल्ला गोमेकॉचे न्याय वैद्यकीय सुविधा सहयोगी प्राध्यापक डॉ. मधू घोडकिरेकर यांनी दिला.
कोरोना ही संसर्गजन्य महामारी आहे. त्‍याचा संसर्ग कुणालाही होऊ शकतो. त्‍यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. कोरोना स्वॅब चाचणी केल्यानंतर काहीजणांचे अहवाल यायला वेळ लागत आहे. त्यामुळे जर ती व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचा अहवाल येण्याआधी ती कित्येकांच्या संपर्कात आलेली असते. नेमकी ती कुणाच्या संपर्कात आली, हे सांगणे अवघड होऊन बसते. त्यामुळे स्वॅब चाचणी केल्यानंतर त्या व्यक्तीने घरातच क्वारंटाईन होणे आवश्यक आहे, जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ़. घोडकिरेकर यांनी केले.

कामाशिवाय घराबाहेर पडू नका!
सध्‍या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लोकांनी घरातच राहावे. कामाशिवाय घराबाहेर पडणे शक्य तेवढे टाळावे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे कमी आढळून आली, तर त्यांनी घरातच १७ दिवस क्वारंटाईन होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
आजही काही ज्‍येष्ठ व्यक्तींना मोबाईल कसा वापरावा, कसा हाताळावा हे समजत नाही. त्यांना घरच्या मंडळीनी थोडेफार शिकवावे. कारण चुकून त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यासोबत कुणाला जाता येत नाही. त्यांना अधूनमधून फोन करता व घेता यावा यासाठी त्यांना मोबाईल कसा वापरायचा ते शिकवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

पंचायतीवर सरकारने पंचायत क्षेत्रातील ज्‍येष्ठांची काळजी घेण्यासंदर्भात जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. जर एखादी ज्‍येष्ठ व्यक्ती दारू पिण्यासाठी बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीला बाहेर जाऊ न देता तिला घरातच त्‍याची व्यवस्था करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

- महेश तांडेल

संबंधित बातम्या