सुदिन ढवळीकर यांची मागणी, कोविडसह इतर विषयांवर हवी चर्चा

प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

राज्यात हाताबाहेर चाललेल्या कोरोना महामारीवर चर्चा करून सरकारला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडणे तसेच राज्याला सतावणाऱ्या इतर विषयांवरही चर्चा करण्यासाठी सरकारने येत्या ऑक्‍टोबर महिन्यात पाच दिवसांचे अधिवेशन घ्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

फोंडा:राज्यात हाताबाहेर चाललेल्या कोरोना महामारीवर चर्चा करून सरकारला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडणे तसेच राज्याला सतावणाऱ्या इतर विषयांवरही चर्चा करण्यासाठी सरकारने येत्या ऑक्‍टोबर महिन्यात पाच दिवसांचे अधिवेशन घ्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.  कोरोना काळात सरकारकडून योग्य आरोग्यसुविधा मिळत नसल्याने लोकांत घबराट पसरली आहे. 

त्यामुळे राज्यातील कोविड व्यवस्थापन, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळासह अन्य कोविड इस्पितळांची स्थिती आणि आरोग्य खात्याची तयारी यासंबंधी ही चर्चा व्हायला हवी. लोकांच्या आरोग्याचा महत्त्वाचा हा प्रश्‍न असून यावर चर्चा करून योग्य निर्णय व्हायला हवा, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून येत्या ऑक्‍टोबर महिन्यात हे पाच दिवसीय अधिवेशन घ्यावे, असे सुदिन ढवळीकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

पत्रकारांशी बोलताना सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की या पाच दिवसांच्या अधिवेशन सत्रात प्रश्‍नोत्तरे व अत्यावश्‍यक असलेल्या विषयांवर सांगोपांग चर्चा करून निर्णय घेणे आवश्‍यक आहे. या पाच दिवसांच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी कोरोनाची स्थिती, लोकांत पसरलेली भीती आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधा तसेच राज्यातील अन्य कोविड इस्पितळातील सेवा यासंबंधी चर्चा व आरोग्य खात्याची कार्यवाही यासंबंधी उहापोह व्हावा. अन्य चार दिवसांत राज्यात गेल्या एक दिवसाच्या अधिवेशनात घाईगडबडीत संमत झालेला अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पातील खर्च, तरतुदी तसेच राज्याची आर्थिक स्थिती, नियमित घेण्यात येणारे कर्ज या विषयांसह महावीर अभयारण्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय प्रकल्पांमुळे नैसर्गिक वनसंपदेवर घातला जाणारा घाला यावर चर्चा व्हायला हवी. राज्यातील खाण बंदीचा विषयही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खाणींचा विषय व म्हादईचे पाणी कर्नाटकने मलप्रभेत वळवल्याने हा विषयही चर्चेला येणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. सरकारने गांभीर्य जाणून हे पाच दिवसांचे अधिवेशन त्वरित बोलवावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या