आर्थिक संकटामुळे समस्यांत वाढ: महामारीचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून कमी दरात काजू

मनोदय फडते
रविवार, 6 सप्टेंबर 2020

महामारी काळातील ढासळलेली अर्थव्यवस्था अद्याप सावरली नसल्याने कित्येक व्यवसाय बंद पडले ते अद्याप पूर्वपदावर आलेले नाहीत. 
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाला महामारीचा फटका जबरदस्त बसला.

सांगे:  महामारी काळातील ढासळलेली अर्थव्यवस्था अद्याप सावरली नसल्याने कित्येक व्यवसाय बंद पडले ते अद्याप पूर्वपदावर आलेले नाहीत. 
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाला महामारीचा फटका जबरदस्त बसला. पण आहे त्यात सुख मानणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांनी शेती, बागायती, काजू पीक याच्याशी एकरूप होऊन टाळेबंदीचा सामना केला. एका बाजूने टाळेबंदी अन् दुसऱ्या बाजूला गरीब लोकांची उपजीविका म्हणून पहिले जाते त्या काजू पिकाला दर नसल्याने मिळेल त्या दराने काजू खरेदी काहींनी केली. कमी दरात काजू खरेदी केली पण तयार काजूगर दरात नुकसान झालेले नाही तो दर वाढतच आहे. यावरून महामारीचा गैरफायदा घेऊन गरिबांचा काजू मिळेल त्या दरात काही जणांनी खरेदी केला. 

ऊस पीक, भातपीक अन दैनंदिन कामात गर्क राहणारा ग्रामीण भाग कोरोनापासून आजही काही अंशी लांब असला तरी महामारीच्या आर्थिक अडचणीत मात्र नक्कीच फसला आहे. खेड्यातून शहराकडे दररोज धावणाऱ्या बसगाड्या आजही बंद आहेत. दळणवळण साधन नसल्याने खेड्यात तयार होणाऱ्या मालाला शहरात चांगला भाव मिळत होता तो बंद झाला. गावातल्या गावात मिळेल त्या दराने विकला जाऊ लागला. बस गाडीवर अवलंबून इतर ठिकाणी जाऊन रोजंदारी करणारा या काळात संपला. प्रवासी नसल्याने बसगाड्या बंद पडल्या. कमी प्रवासी घेऊन खेपा मारणे बसवाल्यांना परवडत नाही. परिणामी महामारीचा फटका बसलेला ग्रामीण भाग कोरोनामुळे नव्हे तर आर्थिक संकटामुळे अडचणीत आला आहे. आज शहरी भागात मिळेल त्या कोपऱ्यात, कट्ट्यावर मासेविक्री केली जात आहे. पारंपरिक मासे विक्रेता मागे पडला पण आज दुचाकी, चारचाकी वाहनातून खास करून युवा वर्ग मासळी विक्री करत आहेत. पहाटे उठून सुरू होणारा हा व्यवसाय दुपारी बाराच्या दरम्यान आटोक्यात येत असतो. धावपळ आहे अन मिळकत पण आहे. अन्य व्यवसाय नाही, रोजगार नाही, नोकऱ्या नाही त्यामुळे युवा वर्ग मासळी विक्री करून घरचा उदरनिर्वाह करत आहेत. 

मिळकत नसल्याने खर्चही कमी
शहरी भाग हा ग्रामीण भागातील लोकांवर अधिकतर अवलंबून आहे. शहरी भागातील आस्थापने खुली आहेत. पण पूर्वीसारखा ग्राहक नसल्याने वाईट दिवस आले आहेत. प्रत्येक दुकानदार हेच मान्य करीत आहे की ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत झाल्याशिवाय बाजाराचे स्वरूप बदलणार नाही. ग्रामीण भागातून दिवसाला एक दोन बसगाड्या सुरू आहेत. त्याचा वापर नोकरदार लोकांसाठी होत आहे. काहीजण आपली वाहने घेऊन ये-जा करतात. पण ज्या लोकांकडे कसलीच वाहतुकीच सुविधा नाही ते धावपळ करू शकत नाहीत. काही प्रमाणात खेड्यातील लोक नेहमीच बाजारात येत असत. पण आज दळण-वळण नसल्याने मिळकत नसली तरी खर्चही कमी होत आहे.

संबंधित बातम्या