" आरोग्याची जबाबदारी घेऊ शकत नसाल तर शाळा सुरू करू नका "

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता २१ नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करू नयेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी आज केली.

पणजी :   विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता २१ नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करू नयेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी आज केली. त्यांनी तसे पत्र शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवले. कोविड महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे चूक ठरू शकते. इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर कोविडची लागण झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

सरकारने २१ नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करताना पालकांकडून हमी घेणे सुरु केल्यानंतर सरकारवर टीका होऊ लागली आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेऊ शकत नाही तर मग शाळा कसल्या सुरु करता अशी विचारणा समाज माध्यमावर होऊ लागली आहे. अनेकांनी शाळा सुरु करू नका, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सरकारने खेळू नये अशा आशयाची विधाने समाज माध्यमावर करणे सुरु केले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर डिसोझा यांनी हे पत्र पाठवले आहे.
या पत्रात त्यांनी नमूद केले आहे, की विद्यालयांत एकाच ठिकाणी स्वच्छतागृहे असतात, त्यातून कोविड पसरणे सहज शक्य आहे.

सरकारने हा धोका ओळखावा. आंध्रप्रदेशात शाळा सुरु केल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर कोविडची लागण झाली आहे. त्यातून धडा घेत शाळा सुरु करण्याचा विचार सरकारने लांबणीवर टाकावा. मुले ही कुटुंबाची भविष्य असतात. त्यामुळे त्यांचे जीवन सरकारने धोक्यात घालू नये.

संबंधित बातम्या