गोव्यात तालुकावार कोविड उपचार केंद्रे

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

एकूणच मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ही तालुकावार कोरोना उपचार केंद्रे सुरू झाली असून त्याचा लाभ गावागावातील नागरिकांनाही मिळत आहे.

पणजी: राज्यातील अनेक ठिकाणी तालुकावार कोविड तथा कोरोना (Corona) उपचार केंद्रे (Step-Up) स्थापन होऊ लागल्यामुळे राज्यातील मुख्य इस्पितळावरील कोविडबाधित रुग्णांचा भार कमी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात बहुतांश मंत्र्यांनी व आमदारांनी (MLA) आपापल्या परिसरातील मोकळ्या जागेमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यासाठी केंद्र स्थापन करणे सुरू केले आहे.(Taluka wise Covid treatment centers in Goa) 

गोव्यात ''या'' ठिकाणी मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्शन

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यासह इतर अनेक मंत्री आणि आमदार, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही मडगाव येथे कोरोना उपचार केंद्र स्थापन केले आहे. ज्या नागरिकांना कोरोनाची कमी लक्षणे असतात. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते आणि त्यामुळे उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात, मडगाव येथे स्थापन करण्यात आलेले ईएसआय कोविड उपचार इस्पितळ असो किंवा फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ असो या इस्पितळांमध्ये कोरोनाबाधितांची गर्दी वाढत होती. त्यामुळेच तेथे उपचाराच्या पायाभूत सुविधा कमी पडत होत्या. हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी तालुकावार कोविड उपचार केंद्रे सुरू  करण्याची जी संकल्पना मांडली होती ती आता प्रत्यक्षात येत आहे. 

नागरिकांनी सहकार्य केल्यास 8 दिवसांत मृत्यूदर कमी होईल; प्रमोद सावंतांचे आवाहन

बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर अशाप्रकारचे कोविड उपचार केंद्र सुरू झाले असून अनेक ठिकाणी अशाच प्रकारची कमी खाटांचीही उपचार केंद्रे सुरू झाली आहेत. डिचोली येथील केशव सेवा साधना हायस्कूलमध्ये अशाप्रकारचे उपचार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपचार केंद्रामध्ये खासगी डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी नेमण्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारी स्तरावर डॉक्टरांची असलेली कमतरता आणि सरकारी डॉक्टरावर आलेला कामाचा ताणही कमी झालेला आहे.

एकूणच मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ही तालुकावार कोरोना उपचार केंद्रे सुरू झाली असून त्याचा लाभ गावागावातील नागरिकांनाही मिळत आहे. एखाद्या इस्पितळ परिसरातील पाच ते दहा व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या, तर त्यांना अशा ठिकाणी ठेवण्यात येते. २० ते ३०  खाटांची उपलब्धता, त्याचबरोबर त्यातील चार ते पाच खाटांना ऑक्सिजनची सोय, त्यांच्या दिमतीला एक रुग्णवाहिका व २४ तास डॉक्टर अशाप्रकारे या कोरोना उपचार केंद्रामध्ये कोरोनाबाधितांना सेवा पुरवली जात आहे. जर एखादा कोरोनाबाधित गंभीर झाला तरच त्याला बांबोळी किंवा मडगाव या ठिकाणी नेण्यात येते. 

भाजप आमदारांना पक्षाचे आदेश
राज्यातील कोरोनाबाधितांना गरज तेथे रुग्णवाहिका उपलब्ध करा, ज्यांना जेवणाची, औषधांची गरज आहे त्यांना ती पुरवा, असे आदेश भारतीय जनता पक्षाने आपल्या आमदार व कार्यकर्त्यांना दिले आहेत. प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हे आदेश दिले आहेत. सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी आज तेथील नागरिकांसाठी रुग्णवाहिका सुरू केली. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनीही आज रुग्णवाहिका सुरू केली आहे.

गोमेकॉतील काही ओपीडी बंद
कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथील महत्त्वाच्या सहा ओपीडी वगळता इतर ओपीडी 30 मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात महत्त्वाच्या शस्त्रक्रिया मात्र केल्या जाणार आहेत.
 

संबंधित बातम्या