तालुकानिहाय ‘कोविड’ निर्मूलन केंद्र उभारणार - वीजमंत्री काब्राल :

Manoday Fadate
गुरुवार, 30 जुलै 2020

सांगे तालुक्यातील ‘कोविड’ परिस्थिती नक्कीच चांगली आहे. लोकांनी सहकार्य करून यापुढेही ती कायम राखून ठेवताना प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक ‘कोविड केअर’ सेंटर सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. स्थानिक पंचायत सरपंच, पंच सदस्यांनी जनतेला ‘कोविड केअर’ सेंटरची गरज जनतेला पटवून देण्याचे आवाहन वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केले.

सांगे,

सांगे तालुक्यातील ‘कोविड’ परिस्थिती नक्कीच चांगली आहे. लोकांनी सहकार्य करून यापुढेही ती कायम राखून ठेवताना प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक ‘कोविड केअर’ सेंटर सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. स्थानिक पंचायत सरपंच, पंच सदस्यांनी जनतेला ‘कोविड केअर’ सेंटरची गरज जनतेला पटवून देण्याचे आवाहन वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केले.
‘कोविड’ हा आजार अनिश्चित काळासाठी आहे, हे जाणून घ्‍यावे. सतत टाळेबंदी हा उपाय नव्हे, ही मानसिकता आता हळूहळू तयार व्हायला हवी. हे करताना आरोग्य खात्याने घालून दिलेले मार्गदर्शक नियम पाळण्याचे आवाहन वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगे नगरपालिका सभागृहात ‘कोविड’ आढावा बैठकीत बोलताना केले. यावेळी सांगेचे आमदार प्रसाद गावकर, उपजिल्हाधिकारी अजय गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर, नगराध्यक्ष केरोज क्रूज यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.
सांगे तालुक्यातील अधिकतर सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा दीड दिवस गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले, ही चांगली गोष्ट आहे. केवळ दोन मंडळानी पाच दिवस, एक मंडळ नऊ दिवस उत्सव साजरा करणार आहे. त्यांची बैठक घेऊन फेरआढावा घेण्याची सूचना मामलेदार मनोज कोरगावकर यांना केली. सर्वच गोष्टी सरकार करणार म्हणून न थांबता समाजसेवक, लोकप्रतिनिधींनी महामारीत आपली भूमिका चोखपणे बजावण्‍याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत मंडळांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे. त्‍यासंदर्भातील सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केली आहे.

आमदार प्रसाद गावकर म्हणाले की, सांगेत कोविड केअर सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलेल्या जागेची पाहणी करणे म्हणजे ते सुरू करणे असे नव्‍हे. काहीजण गैरसमजातून विरोध करू लागले आहेत. घशातील स्रावाचा पडताळणी अहवाल उशिरा येत असल्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या सरकारी कार्यालयात अशी चाचणी घेतली, तर अहवाल येईपर्यंत कार्यालय बंद करून ठेवण्याचा प्रसंग घडत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी त्‍यांनी केली.
या कोविड आढावा बैठकीला आरोग्यधिकारी गीता पै फोंडेकर, डॉ. हेमा नाईक, आरोग्य निरीक्षक वासुदेव नाईक, सांगेचे पोलिस निरीक्षक सचिन पन्हाळकर, केपेचे संतोष देसाई, कुडचडेचे रवींद्र देसाई, सरपंच सूर्या नाईक, किशोर देसाई, अर्जुन नाईक, डोमॅसियो बार्रेटो, संदीप पाऊसकर, उदय नाईक, गणेश मंडळाचे पदाधिकारी व अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.  goa goa

Editing - Sanjay Ghugretkar

संबंधित बातम्या