मोलेच्या सरपंचपदी तन्वी केरकर यांची निवड

dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

मोलेच्या सरपंचपदी तन्वी गुरुदास केरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तन्वी केरकर या दुसऱ्यांदा मोले पंचायतीच्या सरपंच बनल्या आहेत. स्नेहलता नाईक यांच्यावर दाखल केलेला अविश्‍वास ठराव संमत झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून हे पद रिक्त होते.

धारबांदोडा
सोमवारी मोले सरपंचपदाची निवडणूक झाली. तन्वी केरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मोले पंचायत कार्यालयात झालेल्या या निवडणुकीत सर्व सातही पंच सदस्य उपस्थित होते.
२० मे रोजी उपसरपंच सुशांत भगत, पंच सदस्य समर कदम, राजेश सांगोडकर व तन्वी केरकर यांनी सरपंच स्नेहलता नाईक यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठरावाची नोटीस दाखल केली होती. त्यावर २५ मे रोजी चर्चा होऊन अविश्‍वास ठराव मंजूर झाला होता.
२०१७ च्या पंचायत निवडणुकीनंतर सर्वप्रथम तन्वी केरकर सरपंच बनल्या होत्या. चौदा महिने त्या सरपंचपदी राहिल्या. त्यानंतर स्नेहलता नाईक या सरपंच झाल्या होत्या. त्यांनी सतरा महिने सरपंचपद भूषविले होते. मोलेचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. सोमवारी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत निर्वाचन अधिकारी म्हणून धारबांदोडा गटविकास कार्यालयातर्फे अजित जोग उपस्थित होते. पंचायत सचिव अमोल तेंडुलकर यांनी त्यांना साहाय्य केले.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर तन्वी केरकर यांनी आपली दुसऱ्यांदा सरपंचपदी निवड केल्याबद्दल सर्व पंच सदस्यांचे आभार व्यक्त करून सर्वांना विश्‍वासात घेऊन बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या मदतीने पंचायतीचा विकास केला जाईल, असे सांगितले.
निवडणुकीवेळी उपसरपंच सुशांत भगत, पंच सदस्य समर कदम, रामकृष्ण गावकर, राजेश सांगोडकर, बाबू शेळके, स्नेहलता नाईक उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या