सक्षम इलेक्ट्रीक वाहनांसाठी टाटा, टेस्ला, महिंद्रा कंपनीचे प्रयत्न; ‘ईव्ही’च्‍या विक्रीत वाढ

सक्षम इलेक्ट्रीक वाहनांसाठी टाटा, टेस्ला, महिंद्रा कंपनीचे प्रयत्न; ‘ईव्ही’च्‍या विक्रीत वाढ
Tata Motors, Mahindra plans selling electric vehicles in India by Avit Bagle

पणजी: विजेवरील वाहनांचा प्रवास आजची गरज असली, तरी त्याची सुरुवात १९४७ मध्येच झाल्याची नोंद आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ९६ कि. मी. पर्यंतचा प्रवास करण्याची क्षमता असलेल्या या "टामा'' गाड्यांमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने तेलटंचाईशी युद्ध जिंकले. आज "ईव्ही''चा स्वीकार करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने जागतिक तापमानवाढीच्या (ग्लोबल वॉर्मिंग) संदर्भात काही तरी करण्याची इच्छा असलेल्या खरेदीदारांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर "ईव्हीं''च्या विक्रीत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 

या वाढीला हातभार लावण्याचे काम निसान लीफ या मॉडेलसह, टाटा, टेस्ला, महिंद्रा आदी कंपन्या करत आहेत. सर्वाधिक सक्षम असे इलेक्‍ट्रिक वाहन तयार करण्यासाठी प्रत्येक कंपनी प्रयत्नशील आहे. 

पारंपरिक इंधन असलेल्या गाडीऐवजी संपूर्ण इलेक्‍ट्रिक वाहनाचा स्वीकार करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी गाडी तयार करण्याचे मोठे आव्हान कंपन्यांसमोर आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत त्याला काही प्रमाणात यश येताना दिसते आहे. काही गाड्यांमध्ये गॅस इंजिन बसवण्यात येत आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रिक बॅटरी चार्ज करणे अतिशय सोपे झाले आहे. यात अधिक अंतर कापण्याची क्षमता, सर्वोच्च सरासरी, कुठलाही तणाव न घेता वाहन चालवण्याची मोकळीक आणि जागतिक दर्जाची तंत्रज्ञानी वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच जगभरातील ग्राहकांना "ईव्ही'' खरेदी करण्याची प्रेरणा मिळत आहे.

गाड्या आणि गाड्यांची बाजारपेठ या दोन्ही गोष्टी आता प्रगल्भ झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गाड्यांच्या इतिहासात विजेवरील वाहने हा आजवरचा सर्वात मोठा बदल आहे. बॅटरी स्टोरेज असलेल्या या गाड्यांमुळे इंधनाचे गतीत परावर्तन करणारी इंटर्नल कंबशन इंजिन (आयसीई) इतिहासजमा होणार आहेत. या गाड्यांच्या इलेक्‍ट्रिक मोटरमध्ये आयसीईच्या तुलनेत किमान १०० पट कमी हलणारे (२० पेक्षा कमी) भाग आहेत. 

त्यामुळे झीज होण्याचे प्रमाण खूप कमी होते. एका अंदाजानुसार या गाड्यांचा मालकीखर्च एकतृतियांशपर्यंत कमी होऊ शकतो.

किंमत हा निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाचा मुद्दा असला, तरी पर्यावरणाविषयी संवेदनशील असलेले ग्राहक हवेतील प्रदूषण आणि ओझोनच्या थरावर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी या गाड्यांच्या असलेल्या फायद्याला निश्‍चितच महत्त्व देतील. "ईव्हीं''च्या सध्याच्या किमतीत ईव्ही स्टोअरेज बॅटरींची किंमत हा महत्त्वाचा घटक आहे. या बॅटरींची किंमत प्रतिवर्षी सरासरी २० टक्‍क्‍यांनी कमी होत आहे.


सध्या हे दर आजवरच्या नीचांकी पातळीवर असून त्यात घट होतच आहे.  त्यामुळे येत्या तीन-चार वर्षांत इलेक्‍ट्रिक गाड्या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या स्वस्त होतील आणि त्यांच्या वापरखर्चातही खूप घट होईल. 

(क्रमशः)

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com