Tauktae Cyclone Goa: सासष्टीत चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान

Tauktae Cyclone Goa Crop damage due to cyclone
Tauktae Cyclone Goa Crop damage due to cyclone

सासष्टी: तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone ) गोव्याला जोरदार फटका बसलेला असून वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे सासष्टी तालुक्यातील खरिपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. वादळी पावसामुळे सासष्टीत भातशेती बरोबर भाज्याचे मळे व बागायतीची 43 हेक्टरच्या आसपास नुकसानी झाली असून हा नुकसानीचा आकडा 15 लाख रुपयांच्यावर पोचला आहे. आर्थिकदृष्ट्या (Financially)  संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करण्यासाठी सासष्टी कृषी उपविभागीय कार्यालयाने पाहणी केली आहे. (Tauktae Cyclone Goa: Crop damage due to cyclone)

वादळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसून पिके भुईसपाट झालेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. खरीप हंगामातील कापणीला आलेली भातशेतीची पिके आडवे पडून जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सासष्टी तालुक्यातील माकाझन, पारोडा आणि चांदर परिसरात कापणीला आलेला भात खाली पडला असून यात सुमारे २२ हेक्टर शेतजमिनीत ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बेतलभाटी, राय, कुडतरी, वेळ्ळी, नागोवा सुमारे १६ हेक्टर जमिनीत लागवड करण्यात आलेल्या भाज्यांचे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आंबा, केळी व अन्य फळांच्या बागायतीचे सुमारे ६ लाख रुपये नुकसान झाले आहे. 

पावसामुळे पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टी फटका बसला असून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी सासष्टी कृषी उपविभागीय कार्यालयाने पाहणी करण्यास सुरवात केली केली आहे.  आज सासष्टी तालुक्यातील अनेक ठिकाणी पाहणी करण्यात आली असून उद्या सासष्टीतील अन्य भागातही पाहणी करण्यात येणार आहे. पणजी कृषी कार्यालयाकडून पाहणी करण्याची सूचना देण्यात आली असून सासष्टीत ज्या ज्या ठिकाणी भातशेती व अन्य पिकांची नासाडी झालेली आहे त्या त्या भागात पाहणी करून अहवाल पणजी कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती मडगाव कृषी उपविभागीय अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी दिली. तर, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. 

98 झाडांची पडझड !
सासष्टी तालुक्यात तौक्ते चक्रीवादळामुळे सुमारे 98 च्या आसपास ठिकाणी पडझड झाल्याची नोंद झाली असून यातील 46 ठिकाणी पडलेली झाडे हटविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. काही ठिकाणी वीज खांब तसेच ट्रान्सफॉर्मर उन्मळून पडल्याने सासष्टीतील बऱ्याच भागात कालपासून वीज गायब झाली आहे. अग्निशामक दल कालपासून सर्व झाडे हटविण्यासाठी प्रयत्न करीत असून राष्ट्रीय मार्ग, राज्य रस्ता, अंतर्गत रस्ता, घर, वाहन, संरक्षण भिंत आदी ठिकाणी पडलेली झाडे वगळल्यास अन्य अनेक ठिकाणी पडलेली झाडे अद्याप हटविण्यात आली नाही. घर, वाहन, संरक्षण भिंत व अन्य ठिकाणी पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सासष्टीत किती नुकसान झाले आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com