टॅक्‍सीवाले जमिनीवर!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

पर्यटन व्यवसाय जेव्हा जोमात सुरू होता, तेव्हा पणजीतून विमानतळापर्यंत जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा गाडीभाडे घेणारे टॅक्सीवाल्यांचे आता पाय जमिनीवर आल्यासारखे चित्र आहे.

पणजी : पर्यटन व्यवसाय जेव्हा जोमात सुरू होता, तेव्हा पणजीतून विमानतळापर्यंत जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा गाडीभाडे घेणारे टॅक्सीवाल्यांचे आता पाय जमिनीवर आल्यासारखे चित्र आहे. कारण नुकताच एका पर्यटकाला पणजी सचिवालयापासून विमानतळाकडे जायचे होते, हातचे भाडे जाऊ नये म्हणून त्या टॅक्सीवाल्याने ७०० रुपयांत त्या पर्यटकाला विमानतळावर सोडले. 

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायालाही मोठी झळ बसली आहे. सप्टेंबरपासून जरी राज्यात पर्यटकांना परवानगी दिली, तरी म्हणावा तसे पर्यटक अजूनही येत नाहीत. त्यात रेल्वे बंदीचा आणि न परवडणारे विमानभाडे पाहता देशी पर्यटक गोव्यात येण्यास धजावत नाही. महामारीमुळे आर्थिक गर्तेतून टॅक्सी व्यवसायिकही सुटलेले नाहीत. मागील काळात जेव्हा पर्यटन हंगाम जोमात होता, तेव्हा हे टॅक्सीचालक विमानतळावर सोडण्यासाठी मनाला येईल तेवढी रक्कम पर्यटकांना सांगत. पर्यटकांच्या या पिळवणुकीमुळे राज्य सरकारने दर निश्‍चित केले.

अजूनही राज्य सरकारने टॅक्सी दर एकसारखे राहावेत म्हणून गोवा माईल्स या कंपनीद्वारे सेवा सुरू केली. या सेवेला बराच विरोधही झाला. कोरोनामुळे टाळेबंदीच्या काळात टॅक्सी चालकांनाही घरघर सुरू झाली. दोन महिन्यांपासून व्यवसाय सुरू झाले तरी म्हणावा तेवढा पर्यटक गोव्यात येत नाही. जो येतो तो सध्या स्वतःचे वाहन किंवा खासगी बससेवेचे माघारी जाण्याचे तिकीट बुक करूनच. त्यामुळे टॅक्सीचालकांनाही भाडे मिळेनासे झाले आहे आणि आलेले भाडे सोडताही येत नाही, अशी स्थिती कारधारकांची आहे. 

संबंधित बातम्या