"कोरोना महामारीत डिजीटल मीटर्सची सक्ती नको"

"कोरोना महामारीत डिजीटल मीटर्सची सक्ती नको"
goa taxi meter.jpg

पणजी: राज्यात कोरोना (Covid-19) महामारी संकटामुळे टॅक्सी (Taxi) व्यवसाय ठप्प आहे, अशा परिस्थितीत डिजीटल मीटर्सची (Digital Meters) सक्ती ही नाहक सतावणूक आहे. हे संकट कमी होईपर्यंत डिजीटल मीटर्स सक्ती न करता टॅक्सी परवाना नूतनीकरण करण्यात यावे व ॲप ॲग्रिगेटर्स व गोवा माईल्स ॲप सेवा रद्द करण्याच्या मागणीबाबत संघटनेचा निर्णय ठाम असून त्यावर त्वरित तोडगा काढण्यात यावा अशी मागणी आज टॅक्सी मालक संघटनेने पणजीतील वाहतूक कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटून केली. (Taxi license should be renewed without forcing digital meters)

वाहतूक खात्याने 21 मे नंतर टॅक्सी परवान्याचे नूतनीकरण डिजीटल मीटर्स बसविल्यानंतर करण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे हा आदेश कोरोना महामारीत लागू न करता टॅक्सी परवान्यांचे नूतनीकरण करण्यात यावे. कोरोना काळात पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे, काहीच उत्पन्न नाही अशावेळी डिजीटल मीटर्स टॅक्सींना लावून त्या घरात ठेवायच्या काय? असा प्रश्‍न संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर यांनी सहाय्यक वाहतूक संचालक (मुख्यालय) फ्रांसिस्को वाझ यांना केला. डिजीटल मीटर्स बसविण्यासाठी वाहतूक खात्याने टॅक्सींसाठी वेळापत्रक तयार केले आहे व त्या वेळेत मीटर्स न बसविल्यास टॅक्सी परवाना आपोआपच रद्द होईल असे काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सध्या टॅक्सी मालक संकटात आहेत. टॅक्सी व्यवसाय बंद असल्याने उहारनिर्वाह करणे मुष्किलीचे बनले आहे त्यात हे डिजीटल मीटर्स बसविण्याची सक्ती म्हणजे सरकारकडून करण्यात येत असलेली छळवणूक असल्याचा आरोप कोरगावकर यांनी केला. 

मालकांना अगोदर बुकिंग करून 11 हजार 236 रुपये आगाऊ भरण्यास सांगितले जात आहे. या रक्कमेव्यतिरिक्त मीटर्ससाठी जादा पैसे दिले जाऊ नये स्पष्ट करण्यात आले असले तरी या कंपनीकडून डिजीटल मीटर्स बसविण्याचे तसेच इतर कामाचे वेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे असे सांगितले जाते. त्यामुळे या डिजीटल मीटर्स बसविण्यासाठीचा खर्च सुमारे 17 ते 18 हजारांपर्यंत जात आहे. ही बाब वाहतूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास टॅक्सी मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली असता त्यासंदर्भात चौकशी करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. संघटनेच्या ज्या मागण्या व समस्या आहेत त्या लेखी स्वरुपात द्याव्यात जेणेकरून त्या राज्य वाहतूक अधिकारिणीसमोर मांडून त्यावर चर्चा करून योग्य तोडगा काढणे शक्य होईल. आज या अधिकारिणीची बैठक होत आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com