मुख्यमंत्र्यांचा दावा म्हणजे निव्वळ साखळीवासीयांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार आहे

मुख्यमंत्र्यांचा दावा म्हणजे निव्वळ साखळीवासीयांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार आहे
TCP required for Master Plan rejected


 डिचोली: साखळी शहराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी साखळी येथे सरकारी अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीस डावलल्याने विरोधी गटाच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. या बैठकीस आम्हाला का डावलले?  साखळीच्या विकासासाठी विरोधी नगरसेवकांची गरज नाही का? असा प्रश्‍न नगरसेवक राजेश सावळ यांनी उपस्थित करून मुख्यमंत्र्यांसह नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी त्यामागचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी साखळी पालिकेच्या विरोधी गटातर्फे काल रात्री डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
साखळीचा मनापासून विकास करायचा असल्यास विरोधकांना न डावलता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सबका साथ, सबका विकास" या संकल्पनेला अनुसरुन सर्व नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्‍यक आहे, असे मत साखळीचे माजी सरपंच प्रवीण ब्लेगन यांनी व्यक्‍त करून साखळी शहराचा विकास करायची इच्छा असल्यास अगोदर पालिकेतील भ्रष्टाचार थांबवावा अशी मागणी करतानाच, विकासासंदर्भात केवळ वल्गना करू नयेत असा सल्ला दिला. डिचोली येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेस नगरसेवक राया पार्सेकर, कुंदा माडकर, ज्योती ब्लेगन आणि अंसिरा खान तसेच माजी नगराध्यक्ष रियाज खान उपस्थित होते. 

‘मास्टर प्लॅन’वरून दिशाभूल!
साखळी शहराचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करून तो सुडाकडे पाठवण्यात आला आहे. हा मुख्यमंत्र्यांचा दावा म्हणजे निव्वळ साखळीवासीयांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार आहे. ‘मास्टर प्लॅन’साठी आवश्‍यक असलेली ‘टीसीपी’ची मान्यता नाही. या मुद्यावर नगरपालिकेत चर्चा करण्यात आलेली नाही किंवा मान्यताही घेतलेली नाही.  उलट पालिका क्षेत्रात खासगी जमिनीत बांधकामे उभी राहत आहेत. साखळी पालिकेत सध्या कर्मचाऱ्यांना पगार घालण्यासाठीही निधीची कमतरता आहे, असा दावा प्रवीण ब्लेगन यांनी केला.  अगोदर पालिकेतील भ्रष्टाचाराला लगाम घालून पालिकेचा महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी  सर्व नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन श्री. ब्लेगन यांनी केले. विर्डी पूल खुला झाल्यापासून म्हावळंगतडमार्गे वाहतुकीचा ताण वाढलेला असून वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत आहे. या समस्येवर उपाययोजना काढण्यात यश आलेले नाही. विठ्‌ठलापूर येथे वाळवंटी नदीवरील कॉंक्रीटच्या पुलासंदर्भात कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. भविष्यात या पुलामुळे बाजारात  मोठी समस्या निर्माण होणार आहे, असेही प्रवीण ब्लेगन म्हणाले. 

राणे यांना विकासाचे श्रेय!
साखळी शहरात आज जे महत्वाचे विकास प्रकल्प उभे आहेत. त्याचे सारे श्रेय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे यांना जात असल्याचा दावा नगरसेवक राजेश सावळ यांनी केला. इस्पितळ, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, सरकारी महाविद्यालय, जलतरण तलाव, रविंद्र भवन आदी महत्वाचे प्रकल्प प्रतापसिंह राणे यांच्यामुळेच शक्‍य झाले आहेत. असा दावा श्री. सावळ यांनी करुन, उलट मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी साखळीच्या विकासासाठी काय केले, ते दाखवून द्यावे. असे आव्हान केले. अत्याधुनिक बसस्थानक प्रकल्पाचे काम रेंगाळलेलेले असून, या प्रकल्पाच्या निविदेतून लाखो रुपये वाया गेलेले आहे. बसस्थानकावर साधी स्वच्छतागृहाची सोय नाही. साखळी ही ‘ब’ दर्जाची पालिका असूनदेखील एखादे स्वच्छतागृह नसावे, ही पालिकेसाठी शरमेची बाब आहे. असे श्री. सावळ यांनी नमूद करुन, पालिकेत भाजपची सत्ता असताना आणि स्थानिक आमदार मुख्यमंत्री असतानाही एलईडी दिव्यांसाठी पालिकेला दहा लाख रुपये का खर्च करावे लागले? असा प्रश्‍नही श्री. सावळ यांनी उपस्थित केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com