प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी...!

student
student

पणजी

दरवर्षी ४ किंवा ५ जूनला सुरू होणाऱ्या शाळा यावर्षी ‘कोरोना’च्या अनुषंगाने जुलै महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत असताना गोवा राज्य शिक्षण संचालनालय शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या घरी पाठविण्याच्या पर्यायावर विचार करीत आहे. शैक्षणिक वर्ग ऑनलाईन माध्यमातून घेण्याच्या पर्यायावरही शिक्षण खात्याकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ जूनच्या पहिल्या आठवड्यात एरव्ही प्रारंभ झाला असता, पण टाळेबंदी व कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा पाहता शैक्षणिक वर्ष जुलैमध्ये सुरू करण्यावाचून शिक्षण संचालनालयाकडे पर्याय राहिलेला नाही. ऑनलाईन वर्ग घेण्याच्या पर्यायावर खात्यामध्ये विचारमंथन सुरू असताना शिक्षण खात्याच्या संचालिका श्रीमती वंदना राव यांनी शाळांना दिलेल्या सूचनांमध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाणे व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन व मदत करणे, अशा मुद्यांचा या सूचना व प्रस्तावामध्ये समावेश आहे. यासंबंधीचे एक पत्र श्रीमती राव यांच्यातर्फे गोवा हेडमास्तर असोसिएशन या संघटनेकडे पाठविण्यात आले आहे.
श्रीमती राव यांनी म्हटले आहे, की संपूर्ण शालेय अभ्यासक्रम एरव्ही जसा मुलांना वर्गामध्ये समोरासमोर शिकविला जात होता, तसा ऑनलाईन शिकविणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्याव्यतिरिक्त शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी पाठविण्याच्या प्रस्तावाविषयी शालेय स्तरावरील शैक्षणिक संस्थांनी विचार करावा, असा प्रस्ताव श्रीमती राव यांनी खात्याच्यावतीने ठेवला आहे. अर्थातच सामाजिक अंतराचे नियम या भेटीदरम्यान पाळले जावेत, अशी सूचनाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना काही धडे वाचायला दिले असतील तर त्याचा आढावा घेताना किंवा त्यांचे अभ्यासाशी संबंधित प्रश्न सोडविताना शिक्षकांना सामाजिक अंतर पाळावे लागणार आहे. पण, या सर्व प्रक्रियेचे नियोजन करताना विद्यार्थ्यांवर अवाजवी ताण पडणार नाही, याचीही काळजी घावी लागणार असल्याचे श्रीमती राव यांनी या पत्रात नमूद केलेले आहे.
सध्या सार्वजनिक वाहतुकीवर मर्यादा असल्याची स्थिती गृहीत धरून शिक्षकांना शाळेत कामासाठी बोलावण्याविषयीचा निर्णय शालेय व्यवस्थापन घेऊ शकते, असे श्रीमती राव यांनी म्हटले आहे. बहुतेक सरकारी आणि अनुदानित शाळांनी आपल्या शिक्षकवर्गाला आज गुरुवारपासून शाळेत बोलावले आहे. त्याचप्रमाणे सध्या बहुतेक शालेय शैक्षणिक संस्थांमध्ये ऑनलाईन वर्ग घेण्याविषयीचे नियोजन करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.

शाळा सुरू करण्याचा
निर्णय जुलैमध्ये...!

गृह मंत्रालयातर्फे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय जुलै महिन्यात घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गात येऊन हजेरी देणे व धडे घेण्याची मात्र परवानगी दिली जाणार नसल्याचे निर्देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे व नवीन तारखा याविषयाशी संबंधित असलेल्या तज्ञ् व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर जाहीर केल्या जाणार असल्याचे शिक्षण खात्याकडून आलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे आल्यावर यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षण खात्यातर्फे या नवीन आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com