इंटरनेटच्या अडथळ्यातूनही शिक्षकांचे अध्यापन सुरूच

Teachers continue to teach without Internet connectivity
Teachers continue to teach without Internet connectivity

पणजी: प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयाचे ऑनलाईन शिक्षण देणे सुरू झाले असून  इंटरनेटच्या अडथळ्यातूनही शिक्षकांचे अध्यापन सुरूच आहे. बऱ्याच शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना धडे सुरूच ठेवले आहे. शिक्षकांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. वेगवेगळ्या वर्गानुसार अध्ययन साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात येत आहे. गुगलमीट, यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन, पीडीएफ, वर्ड स्वरूपात ज्ञान साहित्याचा वापर शिक्षकवर्गांकडून करण्यात येत आहे.

काही प्राथमिक शाळांतील शिक्षक वाड्यावाड्यावरील युवा, युवती, पालकांतर्फे छोट्या मुलांसाठी ज्ञानसाहित्य पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांमधील शिक्षक गुगल मीटचा वापर करीत आहेत. प्रत्येक वर्गाचा एक समूह तयार करण्यात आला असून त्या त्या वर्गानुसार शिक्षक आपले तास निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार वर्ग घेत आहेत. इंग्रजी, विज्ञान, गणित, सामाज विज्ञानसारखे विषयही शिकवले जात आहेत. हिन्दी, मराठी, कोकणी सारख्या भाषेचे शिक्षकसुद्धा गुगल मीटचा वापर करीत असून काही शिक्षक युट्यूबच्या माध्यमातून अधिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत आहेत.

काही वेळेला इंटरनेटच्या अडथळ्यामुळे वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोचता येत नाही. परंतु त्यांना दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी इतर माध्यमातून शिकवले जाते. त्यांच्यापर्यंत नोटस् दिले जातात, धड्याचा सारांश, कठीण शब्दाचे अर्थ, व्याकरणाचे तक्ते पोचविले जातात. वॉटस्अपच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून दिले जातात. ऑनलाईन शिक्षण १०० टक्के होत नाही. प्रत्यक्ष वर्गातसुद्धा सर्वच विद्यार्थी १०० टक्के अध्ययन कुठे करतात? काही विद्यार्थी दुर्लक्ष करतात. तसाच प्रकार काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षक घेताना करतात तर काही विद्यार्थी नेमकेपणाने शिक्षण घेतात, शिक्षकांना प्रश्न विचारतात, समस्या मांडतात. शंकांचे निरसन करून घेतात. अशा प्रकारे राज्यात शिक्षक सुरू असून पूर्वीपेक्षा ऑनलाईन शिक्षणात प्रगती झालेली आहे, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली.

काही वेळेला विद्यार्थ्यांना आवाज, व्हिडिओ दिसतो, तर काहींना आवाज ऐकू येत नाही. अनेक विद्यार्थी गुगल मीटवर असलेल्या मेसेंजरमध्ये आवाज व्यवस्थित येत नसल्याच्या तक्रारी नोंदवत आहेत. परंतु अशा समस्या कार्यालयीन बैठकांमध्येही उपस्थित होत आहेत. त्यात नावीन्य असे काहीही नाही. याविषयी मुष्टिफंड संस्थेच्या शिक्षकाला विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की इंटरनेटच्या अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आवाज न ऐकू येण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना लेखी माहिती दाखवून शिकविलेल्या भागाचे विश्लेषण दिले जात आहे. विशेष बाब म्हणजे पणजीत राहूनही अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेटचा अडथळा येत होता. इंटरनेट सुविधा सुरळीत होत नाहीत, तोपर्यंत पोचवत आहेत.

काही मुलांकडे अद्याप मोबाईल नाहीत. त्यांना या ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता येत नाही. कारण घरात एक मोबाईल असल्याने काही विद्यार्थ्यांना वर्गांला उपस्थित राहात येत नाही. मग ते विद्यार्थी आपल्या शिक्षकांनी पाठवलेले ज्ञान साहित्य वडील किंवा आई, मोठा भाऊ घरी आल्यानंतर त्यांच्या मोबाईलमधून ते साहित्य घेऊन संध्याकाळी, रात्री अभ्यास करतात. काही विद्यार्थी आपल्या मित्रांकडून साहित्य घेऊन त्यांच्या प्रिंट काढून घेतात. काही विद्यार्थी एकमेकांना साहाय्य करतात. अशा पद्धतीने ऑनलाईन अभ्यासाचे धडे राज्यात सुरू आहेत.

साहित्याची देवाण-घेवाण
वेगवेगळ्या शाळेत शिकविणारे शिक्षक एकमेकांकडून आवश्यक त्या विषयाच्या साहित्याची देवाण-घेवाण करीत आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे. काही शाळांतून ऑनलाईन परीक्षेची तयारीसुद्धा करण्यात येत आहे. काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडून स्वाध्यायही करून घेतला जात आहे. जुलै-ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये ऑनलाईन शिक्षणात प्रगती झाली आहे.

इंटरनेटवर ज्ञानसाहित्य उपलब्ध
इंटरनेटवर शैक्षणिक साहित्याच्या अनेक वेबसाईट असून एनसीईआरटी, सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार गोव्यात उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमासंबंधी बरीच माहिती उपलब्ध आहे. तुकारामाच्या अभंगापासून ते कबीरांच्या दोहेपर्यंत बरीच माहिती उपलब्ध आहे. फक्त त्यातील नेमकी माहिती संकलित करून विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे इतर विषयाचीसुद्धा माहिती उपलब्ध आहे.

साखळी भागात यापूर्वी एका कंपनीची मोबाईलसेवा सुरळीत होती. परंतु ऑनलाईन शिक्षणात इंटरनेटच्या सेवेत अडथळा येऊ लागल्याने मुलाच्या शिक्षणासाठी आम्हाला मोबाईलसेवा बदलावी लागली. हा केवळ आमच्यासाठीच नाहीतर येथील पालकांना पहिल्या कंपनीची सेवा बदलून दुसरी सेवा घ्यावी लागली. - राधिका कामत-सातोस्कर, पालक .

आम्ही ऑनलाईनद्वारे गुगल मीटचा पालकांशी संपर्क साधतो. मुलांसाठी ऑफलाईन म्हणजे व्हॉट्सअॅपवर अभ्यास पाठवतो. परंतु चिंबल, मेरशीसारख्या ठिकाणी इंटरनेट सेवेला अडथळे येतात, असे दिसून आले आहे.. -  विलास सतरकर, मुख्याध्यापक, हेडगेवार प्राथमिक विद्यालय.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com