फोंड्यात दहा वर्षांपूर्वी चोरटयांनी लुटले होते 'एवढ्या' किमतीचे दागिने

Ten years ago thieves looted jewellery in Ponda
Ten years ago thieves looted jewellery in Ponda

फोंडा: फोंडा शहर तालुक्‍यातील इतर ठिकाणच्या सराफी दुकानात तसेच घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. फोंड्यात दहा वर्षांपूर्वी एका सराफी दुकानात सुमारे अठरा लाख रुपयांचे दागिने पळवण्याचा प्रकार घडला होता, मात्र चोरटे हाती लागले नव्हते. 

ज्या इमारतीत हे दुकान होते, त्या इमारतीत दुकानाच्या मागे असलेले अन्य एक दुकान दुरुस्तीसाठी खुले करण्यात आले होते. दुरुस्तीनिमित्त दुकानाचे शटर तेवढे बंद करण्यात आले होते, त्याला कुलूप लावण्यात आले नव्हते. नेमक्‍या याच संधीचा चोरट्यांनी फायदा उठवला होता. या खुल्या असलेल्या दुकानाची भिंत आणि सराफी दुकानाची भिंत एकच असल्याने रात्रीच्यावेळी चोरट्यांनी खुल्या असलेल्या दुकानाची भिंत फोडून सराफी दुकानात प्रवेश केला व सुमारे अठरा लाख रुपयांचे दागिने रातोरात पळवले. 

साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी माशेल येथीलही एक सराफी दुकान फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. गेल्या वर्षी खांडोळा येथील नाईक कुटुंबियांच्या घरात चोरी करून चोरट्यांनी सुमारे दहा लाखांचे दागिने पळवले होते. त्यानंतर टाळेबंदी जाहीर करण्यापूर्वी गेल्या मार्च महिन्यात ढवळी येथे दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी आतील सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे दागिने पळवले होते. सरकारी आदेशानुसार सर्व सराफी दुकानांनी सीसीटीव्ही लावली आहे. तरीही चोरटे नवनवीन शक्कली शोधून चोऱ्या करीत असल्याचे येथील सोन्या चांदीच्या व्यवहारातील दुकानदारांनी सांगितले.

चोरलेले दागिने विकत घेतल्याप्रकरणी फोंड्यातील एका सराफालाही यापूर्वी अटक करण्यात आली होती. फोंडा शहरात तीसपेक्षा जास्त सराफी दुकाने असून या दुकानात मोठ्या प्रमाणात तयार दागिने ठेवले जातात, चोरट्यांकडून टेहाळणी करूनच अशा दुकानात मोठ्या चोऱ्या झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

दुकानदारांना हवी सुरक्षितता!
सोन्या चांदीच्या दुकानातील चोऱ्या वाढत चालल्या आहेत. आता तर सोनारांवर हल्लेही होत आहेत. अशा घटना धोकादायक असून सरकारकडूनच आता दुकानदारांना सुरक्षितता देण्याची आवश्‍यकता आहे. सराफी दुकानदार आपली रोजीरोटी स्वयंरोजगारातून करतात, पण त्यांनाच जर संरक्षण नसेल तर मग आणखी काय बोलणार...! - राजेंद्र कारेकर (सराफी दुकानदार, फोंडा)

सराफी दुकानांना संरक्षण द्या  
माझे शेजारी स्वप्नील वाळके यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना लाभो. गोव्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगावात दिवसाढवळ्या घडलेली ही घटना म्हणजे कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे द्योतक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक समस्येमुळे गुन्ह्यांत वाढ होण्याचा धोका आहे. त्यात सराफी दुकाने गुन्हेगारांचे सहजपणे लक्ष्य ठरू शकते. त्यासाठी सराफी दुकानांना पोलिसांनी विशेष सुरक्षा पुरवण्याची गरज आहे. - विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष

गुन्हेगारांनी त्वरित अटक करा
मडगावमधील सराफी व्यावसायिक स्वप्नील वाळके यांच्यावर झालेल्या भयानक हल्ल्याचा मी निषेध करतो. पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित अटक करावी अशी मागणी मी करत आहे. - अॅड. नरेंद्र सावईकर, अनिवासी भारतीय व्यवहार आयुक्त

सरकारचे अस्तित्वच जाणवत नाही
दरोडा घालण्याच्या प्रयत्नातून भरदिवसा मडगाव येथील सराफी व्यावसायिक स्वप्नील वाळके यांच्या खुनाच्या घटनेने राज्‍य सरकार व प्रशासनाचे अस्तित्व तीळमात्रही जाणवत नाही. गुन्हे वाढत असताना सरकारने सीमा खुल्या केल्या आहेत. जनतेने केलेले मतदान अशा प्रकारचे प्रशासन पाहण्यासाठी नव्हते. गोवा राज्य दुःखाची दरी बनली आहे. - एल्वीस गोम्स, राज्य निमंत्रक, आम आदमी पार्टी

सह्रदयी मित्र गमावला
स्वप्नील वाळके हे गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनचे सचिव होते. त्यांच्या रुपाने आम्ही एक सह्रदयी मित्र गमावला. असोसिएशनच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. ते चांगले वक्ते व लेखकही होते. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाना तपास करून गुन्हेगारांना अटक करावी. सराफी व्यावसायात चोर, दरोडेखोरांकडून हल्ला होण्याची जोखीम असते. कोविड संकटकाळात हा धोका वाढलेला आहे. पोलिसांनी सराफी दुकाने असलेल्या परिसरात गस्त व सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. - प्रमित रायकर, अध्यक्ष,  गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशन 

त्वरित कारवाई करा
या प्रकरणात पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. मडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असा प्रकार घडतो हे उद्वेगजनक आहे. मडगावमध्ये कायदा व सुव्यवस्था कोलमडली असल्याचे यातून दिसते. - रुपेश महात्मे, नगरसेवक व भाजपच्या मडगाव मंडळाचे अध्यक्ष

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com