सांजुझे आरियाल परिसरात रेलमार्ग दुपदरीप्रकरणी तणाव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

कोळसा वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सांजुझे  आरियल पंचायत परिसरात विकास निगम लिमिटेडकडुन मुख्य रस्ता अडवून रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली.

सासष्टी:  कोळसा वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सांजुझे  आरियल पंचायत परिसरात विकास निगम लिमिटेडकडुन मुख्य रस्ता अडवून रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी लोकांनी हजारोच्या संख्येने येऊन काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला असता, प्रकल्पाचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होत असल्याचा दावा करत रेल निगम कडून पोलीस बंदोबस्त घेऊन रातोरात हे काम पूर्ण करण्यात 
आले.

नेसाय रेल्वे क्रॉसिंगवर मंगळवारी मध्यरात्री रेल विकास निगम लिमिटेडकडून मुख्य रस्ता अडवून रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. 

मुख्य रस्ता बंद करून तसेच वाहतूकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्द करून दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिले होते. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गोयात कोळसो नाका या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात सदर संघटनेचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी मेणबत्त्या पेटवून, तसेच प्रकल्पाच्या विरोधात बॅनर, घोषणाबाजी करून कामास विरोध केला. यावेळी त्यांनी स्थानिक पंचायतीचा ना हरकत दाखल उपलब्द नसल्याचा आरोप केला असता जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याचे सांगून रातोरात पाच तासात काम पूर्ण करण्यात 
आले.

दरम्यान, या घटनेबाबत बोलताना पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी आज पर्वरी येथे सांगितले, की या प्रकाराची मला काही कल्पना नाही. मला माहिती घ्यावी लागेल. मी आज मंत्रिमंडळाची बैठक असल्याने थेटपणे घरातून मंत्रालयात आलो आहे.

संबंधित बातम्या