10 वी 12 वी चे वर्ग सुरू कराच, पण सर्व नियम पाळूनच..!

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

कोविड महामारी काही अंशी आटोक्‍यात आल्याने राज्य सरकारने आता दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. येत्या २१ तारखेपासून दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत,

 फोंडा: कोविड महामारी काही अंशी आटोक्‍यात आल्याने राज्य सरकारने आता दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. येत्या २१ तारखेपासून दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, त्यासाठी संबंधित घटकांशी सरकार संवाद साधणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर फोंडा तालुक्‍यातील बहुतांश पालकांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. वर्ग सुरू कराच, पण आवश्‍यक खबरदारी घ्या, असे मतही या पालकांनी व्यक्त केले आहे.

फोंडा तालुक्‍यात दहावी व बारावीचे एकूण चार हजार विद्यार्थी संख्या अपेक्षित आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देताना त्यांची आसन व्यवस्था निर्धारित करण्याची गरज आहे. वर्गात सामाजिक अंतर राखून तसेच सॅनिटाईझ करूनच हे वर्ग सुरू करणे ईष्ट ठरेल. वर्गाबरोबरच विद्यार्थ्यांची वाहतूक सुविधाही व्यवस्थित असणे आवश्‍यक आहे.

शहर परिसरातील विद्यालये तसेच उच्च माध्यमिक विद्यालयात खुद्द पालकांकडून काही विद्यार्थ्यांना शाळेत पोचवले जाईल, मात्र इतर विद्यार्थ्यांना बालरथांची आवश्‍यकता भासणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची योग्य सोय करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. खास करून बालरथांवर या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची भिस्त राहणार आहे. 
आतापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत होते. मात्र ही सुविधा तकलादू ठरत असून "नेट''ची सुविधा नसल्याने विशेषतः ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. फोंडा तालुका हा डोंगरदऱ्यांचा भाग असून बऱ्याचदा मोबाईलचे नेटच उपलब्ध होत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर परिणाम होत आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे सरकारने तसेच संबंधित शाळा विद्यालयांच्या व्यवस्थापनांनी काटेकोर लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

राज्यात पालकांना 
ड्रायव्हिंग स्कूल चालते का?

कोरोना काळात सध्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. केवळ फोंड्यातच नव्हे तर राज्यात ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालवणे शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक नोंदणी करीत आहे. या युवकांत अठराच्या पुढील वयोगटातील मुलांचा जास्त समावेश आहे. विशेष म्हणजे एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलसमोर फेरफटका मारला तर मुलांबरोबरच मुलीही अशा इच्छुकांत मोठ्या प्रमाणात दिसतील. एकापरीने शाळांना विरोध करायचा आणि शाळा बंद असल्याने मुलांना सुटीचा फायदा व्हावा यासाठी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये भरती करायचे, असा दुटप्पीपणा सध्या चालला आहे.

खाण कंपन्यांचे घ्या सहकार्य
दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी कार्यवाही होत असल्याने विशेषतः खाण भागात विद्यार्थ्यांची वाहतुकीअभावी मोठी गोची होणार आहे. आधीच खिशात पैसा नाही, त्यातच खाण पट्ट्यात बसवाहतूक सेवा अपुरी आहे. कदंब बसगाड्या नगण्य आहेत, बहुतांश खाजगी बसगाड्या बंदच आहेत, त्यामुळे मुलांनी कसे काय वर्गात जावे, असा सवाल आहे. सरकारने त्यासाठी खाणपट्ट्यात कार्यरत सर्व खाण कंपन्यांचे सहकार्य घेऊन पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बसगाड्या किंवा जीपगाड्यांची सोय करावी. या खाण कंपन्यांनी आतापर्यंत करोडो रुपये कमावले आहेत, त्यातील काही भाग हा शिक्षणासाठी खर्च करणे ही त्यांची जबाबदारीच आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी खाण कंपन्यांच्या व्यवस्थापनाला आदेश देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दहावी बारावी नीट परीक्षा
व्यवस्थित  झाल्या...

आतापर्यंत दहावी, बारावी आणि नीटच्या परीक्षाही गोव्यात व्यवस्थितपणे पार पडल्या आहेत. या परीक्षा आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेऊनच पार पडल्या, आणि त्याला सर्व घटकांचे व्यवस्थित सहकार्य मिळाले. त्यामुळे आताही दहावी व बारावीचे वर्ग सुरू करताना आवश्‍यक ती खबरदारी घेऊनच हे वर्ग सुरू करायला हवेत. अन्यथा एक वर्ष वाया गेल्यातच जमा होईल, अशाही बहुतांश पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
पालक, शिक्षकांच्या  प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. सरकारच्या निर्णयाचे  स्वागत करणाऱ्यांना मुलांचे वर्ष वाया जाते, असे वाटते. मुले कंटाळली आहेत, असे मत आहे. परंतु शाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा आहे. तर काही पालकांचा सरकार किंवा शाळा व्यवस्थापनावर विश्‍वासच नाही. कोरोनापूर्व काळातसुद्धा स्वच्छतेच्या नावाने अऩेक शाळांतून गौरसोयच स्पष्ट झाली आहे. शुद्ध पेय जल किंवा सॅनिटायझरची व्यवस्थाच नाही, तेथे दररोज निर्जतकीरण करणे शक्य नाही, त्यामुळेच बहुसंख्य पालक, शाळांतील पालक संघाचा  शाळा सुरू  करण्यास विरोध आहे.  त्यात तथ्य आहेच. त्यामुळे शाळातील सुरक्षिततेवर भर द्यावा,असेही पालकांचे मत आहे.

संबंधित बातम्या