शिक्षण खात्याने आज दहावी आणि बारावीचे वर्ग २१ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे परिपत्रक केले जारी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

दहावी आणि बारावीचे वर्ग २१ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे परिपत्रक आज शिक्षण खात्याने जारी केले. तब्बल आठ पानांच्या या परिपत्रकात शालेय संस्था चालकांसाठी अनेक नियम व अटी घातल्या आहेत.

पणजी: दहावी आणि बारावीचे वर्ग २१ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे परिपत्रक आज शिक्षण खात्याने जारी केले. तब्बल आठ पानांच्या या परिपत्रकात शालेय संस्था चालकांसाठी अनेक नियम व अटी घातल्या आहेत. या परिपत्रकात पालकांकडून पाल्याला शाळेत पाठवण्यासंदर्भात लेखी संमती घेण्याचा मात्र कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे लेखी संमती मागण्याचा प्रकार हा शाळेच्या पातळीवर बहुधा शिक्षण खात्यातून दिलेल्या तोंडी सुचनेवर आधारीत असावा, असे दिसते.

काय म्‍हटले परिपत्रकात?
शाळेचे वर्ग, प्रयोगशाळा व अन्य सामुदायिक सुविधा एक टक्का सोडियम हायड्रोक्लोराईटने स्वच्छ कराव्यात. तसेच विद्यार्थ्यांचा संपर्क येणार तेथे जास्त लक्ष द्यावे. ज्या शाळा अलगीकरण केंद्र म्हणून वापरल्या गेल्या तेथे जास्त स्वच्छता करावी. सहा फुटाचे अंतर दर्शवणाऱ्या खुणा रेखाव्यात. शक्य तो खुल्या जागेत मुलांना शिकवावे. स्थानिक आरोग्य केंद्र व मदतीचे क्रमांक दर्शनी फलकावर प्रदर्शित करावेत, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

स्‍वच्‍छता, सावधगिरीवर भर
परिपत्रकात म्हटले आहे, की वातानुकुलन यंत्रणा असल्यास त्याचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे. विद्यार्थ्यांना शाररीक अंतर पाळूनच लॉकर वापरू द्यावेत. शिक्षक व कर्मचाऱ्यांना मुखावरणे व सॅनिटायझर्स उपलब्ध करावेत.  फरशी दररोज स्वच्छ करावी. शैक्षणिक साधनांची ७० टक्के सॅनिटायझरने स्वच्छता करावी. विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत स्वच्छता करण्यात सहभागी करून घेऊ नये. या साऱ्याची अंमलबजावणी करण्यास शाळा व्यवस्थापनास जबाबदार असेल असे शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी या पत्रकात नमूद केले आहे. 

शैक्षणिक संस्‍थांना 
सतर्कतेचे निर्देश

एका वर्गात १२ पेक्षा जास्त विद्यार्थी असू नयेत. वर्ग खोल्या लहान असल्यास वर्ग घेण्यासाठी प्रयोगशाळा कक्ष, वाचनालय, संगणक कक्ष आदींचा वापर करावा. एकावेळी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, असे वेळापत्रक तयार करावे. सम - विषम प्रमेयाचा वापर करता येईल. विद्यार्थ्याचे शरीर तापमान नोंदीची व्यवस्था असावी. मध्यंतरावेळी विद्यार्थी घोळका करणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सहा फुटाचे किमान शाररीक अंतर ठेवण्याविषयी विद्यार्थ्यांत जागृती करावी. मुखावरण, सुरक्षित शारीरिक अंतर आणि सॅनिटायझर्सचा वापर सुरू ठेवावा. कुठेही थुंकण्यावर बंदी घालावी. विद्यार्थ्यांनी कोणत्‍याही गोष्टींचे आपसांत अदान - प्रदान करू नये. विद्यार्थ्यांनी सूचना न पाळल्यास पालकांना त्याची कल्पना द्यावी, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या