परीक्षेतील गुण वाढले; पण, गुणवत्ता घसरली

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

प्रा. अनिल सामंत : केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत

म्हापसा: दहावी-बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण हल्लीच्या वर्षांत पूर्वीपेक्षा खूपच वाढत असले तरी त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चितच मोठया प्रमाणात कमी झालेली आहे, असे मत व्यक्त करून, केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण त्या दृष्टीने सकारात्मक असल्याचे शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिल सामंत यांनी स्पष्ट केले.

या एकंदर परिस्थितीबाबत विश्लेषण करताना प्रा. सामंत म्हणाले, याला आतापर्यंतची आपली परीक्षेची पद्धत कारणीभूत आहे. काही विषयांसंदर्भात संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण हेतुपूर्वक वाढवले जायचे. स्वत:च्या शैक्षणिक संस्थेचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल वाढावा हा त्यामागील दृष्टिकोन असायचा. संबंधित शिक्षणसंस्थेच्या शिक्षकांना परीक्षणाची जबाबदारी दिली जात असल्याने असे प्रकार व्हायचे. तसेच, बोर्डाची प्रश्नपत्रिका थोडीफार जरी कठीण असली तरी पालक व इतर लोकही आंदोलनात्मक पवित्रा घ्यायचे. काही वेळा थोड्याफार प्रमाणात चुकलेल्या उत्तरांच्या बाबतीतही पैकीच्या पैकी गुण देण्याची प्रवृत्ती सुरू झाली. या एकंदर प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले; पण, त्यांच्या गुणवत्तेत मात्र वृद्धी होऊ शकली नाही. हल्लीच्या काही वर्षांतील यासंदर्भातील सत्य परिस्थितीचे अवलोकन केल्यास विद्यार्थी नापास होणे तसे कठीण झाले आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या कित्येक वर्षांपासून मूल्यशिक्षण, कलात्मक संस्कार इत्यादी बाबींचा पुरस्कार सरकार करीत असले तरी त्या योजना कागदावरच राहिलेल्या आहेत. परंतु, अशाही परिस्थितीत गोव्यातील काही मोजक्याच विद्यालयांचे व्रतस्थ शिक्षक खरोखरच समर्पित वृत्तीने कार्य करून विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण करण्यात, त्यांची खरी गुणवत्ता वाढवण्यात योगदान देत आहेत, असेही प्रा. सामंत यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता पाहताना त्यांच्याकडे असलेले खरे गुण, त्यांची कौशल्ये यांचा विचार परीक्षकांनी आवर्जून करायला हवा. परंतु, ते सारे काही सर्वस्वी शासकीय धोरणावरच अवलंबून आहे. नवीन शिक्षण धोरणातून यापैकी कित्येक गोष्टी साध्य होतील, असा दावाही प्रा. सामंत यांनी केला.

ते पुढे म्हणाले, मुख्य म्हणजे स्वत:च्या मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून पालकांनी स्वत:च्या मनोवृत्तीत बदल घडवून आणणे गरजेचे आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका थोडीशी कठीण आली म्हणून विद्यार्थ्यांनी अथवा पालकांनी घाबरून जाऊ नये. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे यातूनच संबंधित विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिसून येते. दहावी-बारावी परीक्षेत भरपूर गुण मिळाले म्हणजे स्वत:चे पूर्ण आयुष्य घडले असा गैरसमज मनात बाळगणे अयोग्य आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की त्यांच्यापेक्षाही कमी गुण मिळालेले विद्यार्थी भावी आयुष्यात खरा विकास साधत असतात. त्याबाबतची कित्येक उदाहरणेही देता येतील, असेही त्यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या