
Fire In Goa: राज्यभरात तब्बल 28 ठिकाणी आगीचे तांडव सुरूच आहे. सत्तरीतील म्हादई वन्यजीव अभयारण्यात शनिवारी लागलेली आग डोंगराळ आणि दुर्गम भागात अजूनही धुमसत असून 7 ठिकाणी आग कायम असल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी कबूल केले.
गोवा राज्य अग्निप्रलयात होरपळले जात असताना प्रशासन मात्र धीम्या गतीने हालचाली करत असल्याने आगीच्या दुर्घटनांवर पूर्णत: ताबा मिळवता आलेला नाही.
आग विझविण्यासाठी हवाई आणि नौदलाचे प्रयत्न सुरूच असून आज दिवसभरात 28 हजार लिटर पाणी या आगीवर ओतण्यात आले. तरीही अद्याप आग धुमसणे सुरूच आहे.
या आगीमुळे म्हादई वन्यजीव अभयारण्याचे मोठे नुकसान झाले असून वन विभाग, पोलिस आणि अग्निशमन प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जंगलात आग लावणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. अशा घटना समोर आल्यास थेट एफआरआय नोंदवत दोषींना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
म्हादई खोऱ्यात विदारक स्थिती :
म्हादई अभयारण्यात शनिवारपासून आग धुमसत असून साट्रे, देरोडे, अनमोड घाट, शिगाव-काले, पोट्रे-नेत्रावळी, कारेमळ-काले, धारबांदोडा याठिकाणी आग सुरूच असून या आगीमुळे म्हादई अभयारण्याची अपरिमित हानी झाली असून सुमारे 400 पेक्षा जास्त हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.
यात साट्रे गड, मोर्ले गड, करंझोळ आणि चरावणे डोंगराचे माथे जळाले आहेत. इथली जैवविविधताही धोक्यात आली आहे.
नियंत्रण मिळवण्यासाठी 797 जवान तैनात :
राज्यभर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 797 जवान तैनात केले आहेत, अशी माहिती वनमंत्री राणे यांनी दिली. जवळपास 50 कर्मचारी मोलेजवळील दुर्गम भागात तैनात केले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आग भडकत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासह लक्ष ठेवण्यासाठी हे कर्मचारी कार्यरत आहे.
कोणी जाणूनबुजून आग लावत असल्याचे आढळले तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना त्वरित अटक केली जाईल. वन, अग्निशमन दल आणि पोलिस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
चोहोबाजूंनी आगीचे लोण
गुरुवारी राज्यभर 28 आगीच्या दुर्घटना नोंदवल्या. यात विठ्ठलापूर येथील झारीवाडा, साखळी, बर्नुदे-कुंकळ्ळी, बोरी तसेच अनमोड घाटावरील दूधसागर, नगर्से, काणकोण येथील आगीच्या दुर्घटनांचा समावेश आहे. उसगाव येथे एका कारखान्यालाही आग लागली.
पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात....
1 अभयारण्याला विरोध करणारे घटकच आहेत आग दुर्घटनेला जबाबदार; साट्रे, मोलेतील आग नैसर्गिक नव्हे, मानवनिर्मित!
2 वणवा लागला तर तो विझविण्याची यंत्रणा वन खात्याकडे नाही. वणव्यानंतर जे व्यवस्थापन करायचे, ते वन खात्याने केलेले नाही.
3 ही आग नैसर्गिक म्हणता येणार नाही. कारण जंगलात जी आग लागते, त्याप्रकारची झाडे येथे नाहीत. तशा प्रकारची झाडे केवळ हिमालयात.
4 जंगलात अशी झाडे असतात, ज्यामुळे एकमेकांच्या घर्षणाने उडालेल्या ठिणगीतून वणवे पेटतात. गोव्यात अशी झाडे नाहीत. त्यामुळे सत्तरीतील आग नैसर्गिक म्हणणे चुकीचे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.