वास्को शहर विविध समस्यांच्या विळख्यात

वास्कोत पार्किंग समस्या असून सुसज्ज मासळी मार्केट, बसस्थानकांची गरज आहे.
Vasco

Vasco

Dainik Gomantak 

वास्को: वास्को शहर हे विविध समस्यांच्या गर्तेत सापडले असून याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या समस्या सुटणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वास्को शहराला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी या मतदारसंघातील आमदारांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली होती. मात्र ती गेल्या पाच वर्षांच्या काळात अपुरी राहिली आहे. याचे नेमके कारण काय? याच विवंचनेत नागरिक पडले आहे. विस्तारणाऱ्या वास्कोत पार्किंग समस्या असून सुसज्ज मासळी मार्केट, बसस्थानकांची गरज आहे.

<div class="paragraphs"><p>Vasco</p></div>
मेळावलीतील आंदोलनापुढे सरकारही झुकले

वास्को (Vasco) शहर हे राज्यातील मुख्य शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी विमानतळ, बंदर, रेल्वे स्थानक आदी महत्त्वाचे प्रकल्प आहेत. पण वास्कोत बेशिस्तपणात वाढ होत चालली आहे. वास्को शहरात पादचाऱ्यांसाठी अनेक ठिकाणी असलेल्या फुटपाथवर विक्रेत्यांचे तर काही ठिकाणी दुचाक्यांचे अतिक्रमण होत असल्यामुळे वास्को शहर समस्यांच्या गर्तेत हरवून बसले आहे. वास्को वाहतूक पोलिस आपल्या परीने यात सुधारणा घडवून आणण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, पोलिसांनी (Police) जरा पाठ फिरवली, की येरे माझ्या मागल्याची पुनरावृत्ती होत आहे. याचा पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पदपथ नेमके कोणासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुसज्ज बसस्थानकाची गरज

बसस्थानक हे वास्कोतील अनेक दुखण्यांपैकी एक. बस स्थानकाचा संबंध तसा पूर्ण मुरगाव तालुक्याशी येतो. आंतरराज्य प्रवासी वाहतूकही बसस्थानकातूनच होते. त्यामुळे कोणत्याही प्रांतात बसस्थानकाला फार महत्त्व असते. मात्र, मुरगाव तालुक्यात बसस्थानकाला आतापर्यंत फार कमी महत्त्व दिले गेले आहे. मुरगाव हा राज्यातील औद्योगिक तालुका आहे. या तालुक्यात जगाला जोडणारे विमानतळ. जगप्रसिद्ध मुरगाव बंदर आहे. देशासाठीच नव्हे, तर जगासाठीही वास्को शहर आणि एकूण मुरगाव तालुका गोव्यातील एक प्रमुख केंद्र आहे. शहरात एक सुसज्ज असे बसस्थानक नाही हे दुर्दैवच. वास्कोतील जनतेमध्ये या समस्येबाबत चीड आहे.

वास्को हे राज्याबरोबरच जगाच्या नकाशावरील प्रमुख शहर आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच महिन्यात येथील मतदारसंघात अनेक विकासकामे राबविली जाणार आहेत. मतदारसंघातील समस्यांचा आढावा घेताना संपूर्ण वास्को शहराचाच विकास करण्याच्या दृष्टीने सरकारचा विचार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी ग्वाही वास्को भेटीदरम्यान हल्लीच दिली होती. वास्को मतदारसंघातील कदंब बस्थानक प्रकल्प, वास्को मासळी मार्केट, अग्निशामक दलाच्या इमारतीचे कामही मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले होते.

पार्किंग समस्या

खराब रस्ते वाहतूक कोंडीला जबाबदार आहेत. शहरात बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच काही वेळा खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रकारही घडत आहेत. मुरगाव पालिका हद्दीतील रस्त्यावर होणारी वाहन पार्किंग समस्या दूर करण्यासाठी सल्लागाराच्या निर्णयानुसार, वास्को व परिसरातील रस्त्यावर पे पार्किंग पद्धत सुरू करण्याचा निर्णय १२ ऑक्टोबर २०१९च्या पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, तो निर्णय आजपर्यंत लालफितीत राहिला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका लवकरच महत्त्वपूर्ण पावले उचलणार असल्याची घोषणा विद्यमान नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केली होती. कारण शहरात रेंट अ कार व रेंट अ कॅबच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या वाहनांची संख्या पाचशे ते सहाशे झाली आहे. सदर वाहनांचे मालक सदर वाहने रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी पार्किंग करून आपला व्यवसाय चालवतात. त्यामुळे अन्य वाहनांना पार्किंगसाठी (Parking) मोठी समस्या निर्माण होत आहेत.

अग्निशामकची नवी इमारत

वास्को येथील अग्निशामक केंद्राच्या नूतन इमारत बांधण्याच्या कामास चार वर्षानंतर वेग आलेला असून या इमारतीच्या बांधकामाची इतर कोणत्याच प्रकारची तयारी झालेली नसल्याने ही इमारत पूर्ण होईपर्यंत आणखी किती वेळ वाया जातील, याची निश्चिती नाही. येथील कदंब वाहतूक मंडळाच्या राज्य सस्थाकाजिक दहा वर्षापूर्वी वास्को अग्निशामक इमारत बांधण्यात आली होती. पण या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट झालेले असल्याने ही इमारत कमकुवत आणि धोकादायक बनली होती. या इमारतीचा भाग दुर्घटना होऊ नये, यासाठी काही काळ या इमारतीच्या कमकुवत खांबांना संरक्षण म्हणून त्या खांबांना लोखंडी टेकू लावून पर्यायी तात्पुरती व्यवस्था केली होती, अशा स्थितीत अग्निशामक दलाचे जवान या इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉर्निटरीत राहात होते.

<div class="paragraphs"><p>Vasco</p></div>
गोव्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूरच्या अंबाबाईकडे साकडं

तिढा मासळी मार्केटचा!

जवळपास चाळीस वर्षांपासून रेंगाळत राहिलेला वास्को शहरातील मासळी मार्केटचा प्रश्न सुटण्याची, चिन्हे निर्माण झालेली आहेत. गेल्या महिन्यात पायाभरणी आणि कामालाही प्रारंभ करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. आमदार कार्लुस आल्मेदा आणि माजी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील गोवा राज्य शहर विकास प्राधिकरणातर्फे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. वास्कोतील तीन प्रकल्पांसाठी पालिकेने आपला २३ कोटींचा निधी मुरगाव सूडाकडे सुपूर्द केला आहे. सात वर्षांपूर्वी या ठिकाणी नवीन पक्के मासळी मार्केट उभारण्यासाठी आमदार कार्लुस आल्मेडा (Carlos Almeida) यांनी नियोजन केले होते. त्यासाठी सर्व तयारीही झाली होती. मात्र, या मासळी मार्केटमधील विक्रेत्यांनी गैरसोयी मांडून या प्रकल्पाला आक्षेप घेतल्याने पुन्हा वाद निर्माण झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com