
Religious Traditions शेकडो वर्षांची परंपरा असलेला जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थानचा गुलालोत्सव आज मंगळवारी ढोलताशांच्या गजरात भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.
गोव्याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शेकडो भाविकांनी उपस्थिती लावून गुलाल उधळला. ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, ‘ओस्सय...ओस्सय’ आदी घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता.
मठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे दरवर्षी या गुलालोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हळदुणे कार्यक्रमाने श्री रामनाथ दामोदर देवस्थानच्या शिगमोत्सवाला प्रारंभ होतो. गोव्याबरोबरच शेजारील राज्यांतही प्रसिद्ध असलेल्या देवस्थानच्या गुलालोत्सवाला भाविकांचा महासागर लोटतो. दरवर्षी आठ दिवस शिगमोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
मठग्रामस्थ हिंदू सभेची सदस्य पूर्वी आठ दिवस जांबावलीत मुक्काम करत असत. पण आता काही सभासद मुक्काम करतात तर काही या आठ दिवसांत आपला मुक्काम जांबावलीला हलवतात. या आठ दिवसांत सहा दिवस दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी रोज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
आठ दिवसीय शिगमोत्सवाची आज धुळपेठेने सांगता
शिगमोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी पहाटे 1 वाजता ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. नंतर सकाळी 6 वाजता श्री दामोदर देवाची पालखी नाचतगाजत मिरवणुकीने श्री रामनाथ देवाच्या भेटीस गेली.
दुपारी 3.45 वाजता श्री दामोदर देवाच्या पालखीवर गुलाल उधळून गुलालोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही तेवढ्याच उमेदीने सुरू आहे. गुलालोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या बुधवारी आठव्या दिवशी सकाळी ११ वाजता मठग्रामस्थ हिंदू सभेचे सभासद धुळपेठ साजरी करतात व या आठ दिवसांच्या शिगमोत्सवाची सांगता होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.