
Saal Gade : साळ येथील प्रसिद्ध गडेत्सवातील होळी दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल या गावातील वामन वासुदेव नाईक व कुटुंबीयांनी श्रीचरणी अर्पण केली. होळीदिवशी साळ येथून गडेमंडळ, ग्रामस्थ व भाविकांकडून आपापल्या वाहनांनी 30 किलोमीटर लांब जाऊन कुंब्रल येथील बागायतीतील आंब्याच्या झाडाची (होळी) सदाशिव गाडगीळ यांच्या पौरोहित्याखाली विधीवत पूजा करण्यात आली.
त्यानंतर सेवा करी हनुमंत घाडी यांच्या हस्ते आंब्याचे झाड होळी म्हणून तोडण्यात आले. बागायतीत दाटीवाटीत असलेली अंदाजे 76 फूट लांब अशी ही होळी खडतर प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आली व त्यानंतर तिला ट्रकवर चढवून सुस्थितीत बांधून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने साळला नेण्यात आले.
ही होळी कुंब्रल, पणतुली, कुडासे, भेडशी, झरेबांबर, आंबेली, दोडामार्ग, खोलपेवाडीमार्गे साळ सीमेपर्यंत पोहोचली तर नंतर साळमध्ये सुवासिनींनी ठिकठिकाणी खणा-नारळाने ओटी भरून स्वागत केले. रात्री 10 वाजता मिरवणूक महादेव मंदिराच्या प्रांगणात पोहोचली.
च्यारी कुटुंबीयाच्या हस्ते होळीचे ओबडधोबड अंग तासले. हे काम पूर्ण होण्यास मध्यरात्रीचे दोन वाजले. नंतर तिला आंब्याच्या डहाळ्या बांधून सुशोभीत केले तसेच गडेमंडळ, ग्रामस्थ व भाविकांनी तरफांचा आधार देत रात्री पावणेतीन वाजता होळी उभी करण्यास सुरवात केली व पहाटे पावणेचार वाजता नेमात (खड्ड्यात) उभी केली.
यावेळी होळी उभी करताना बघण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील, गोव्यातील डिचोली, बार्देश, पेडणे व सत्तरी आदी तालुक्यांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. नंतर गडा सदस्य जनार्दन राऊत यांच्या हस्ते पुरोहित सदाशिव गाडगीळ यांच्याकरवी विधीवत पूजा करून अल्पशी आग लावली.
भाविकांची गर्दी उसळणार
मंगळवारी पहिली रात्र असून बुधवार व गुरुवारी शेवटची रात्र असल्याने भाविकांची मोठी गर्दी उसळणार ही अपेक्षा ठेवून विविध प्रकारची शेकडो दुकाने कार्यक्रम ठिकाणी दाखल झाली आहेत.
त्यांना योग्य प्रकारे जागा देण्यात देवस्थान कमिटीचे अध्यक्ष कालिदास राऊत, सचिव विशाल परब व देवस्थान मंडळाचे सदस्य जातीने उत्सव ठिकाणी उपस्थित आहेत. सांजवेळेला उभ्या केलेल्या होळीला झेंडूच्या फुलांनी युवकांनी सजविले. येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी येथील प्रत्येक कुटुंब भोजनाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.