माशेलात चोरट्यांनी सहा दुकाने फोडली

theft
theft

खांडोळा

माशेल बाजारातील सहा दुकाने चोरट्यांनी बुधवारी रात्री फोडली. कोणत्याही दुकानात खूप मोठी रक्कम हाती लागली नाही. त्यामुळे चोरट्यांनी दुकानात असलेल्या गल्ल्यांतील सर्व दुकानातील मिळून २० हजार रुपयांची रोकड आणि स्वीटमार्टमधील पेढे व इतर मिठाई, देवकी कलेक्शनमधील चप्पल, छत्री, पायमोजे, मोबाईल दुकानातून काही मोबाईल व इतर साहित्य, मद्याच्या दुकानातून काही मद्याच्या बाटल्या पळवल्या. एकूणच माशेलात चोर आले, चोरी केली, पण हाती विशेष काही लागले नाही. त्यामुळे ते पेढे खाऊन, नव्या चप्पल पायात घालून मद्याच्या बाटल्या सोबत घेऊन गेले. परंतु जवळच असलेल्या पोलिस चौकी किंवा गस्तीवरील पोलिसांना या घटनेचा सुगावा कसा लागला नाही, हीच चर्चा माशेलात दिवसभर रंगत होती.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दिवसभर पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रिकरणाद्वारे चोरट्यांचा शोध घेतला. एका ठिकाणी चोरटे गाडीवरून आल्याचे निदर्शनास आले असून त्यांचा शोध सुरू आहे. एकूण चार चोरटे असावेत आणि ते दोन गाड्यांवरून आले असावेत, अशी माहिती सीसी टीव्हीतून मिळाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिकारी मोहन गावडे, अजित उमारे, श्री. शिरोडकर, संदीप नाईक, जयवंत भर्तू अधिक तपास करीत आहेत.
माशेलातील सर्वच दुकानांचे शटर उघडून चोरटे आत गेले असून त्यांनी तेथे मोठी रोख रक्कम दुकानात नसल्यामुळे त्यांनी तेथील आवश्यक साहित्य उचलले असावे, असा अंदाज दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. महालक्ष्मी स्वीट मार्टचे मालक म्हणाले, पेढे त्यांनी खाल्ले असून काही प्रमाणात इतर मिठाई, फरसाणही पळविले असावे. रोखड फक्त ९०० रुपये होते, तर श्री देवकी कलेक्शन या वेगवेगळ्या चप्पलच्या दुकानातून साधारणतः ४ ते ५ हजार रुपये व आकर्षक चप्पल, पायमोजे, विविध रंगाच्या छत्र्या पळविल्या, असे आस्थापनाचे मालक स्वप्नेश कुडाळकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अजय वाईन या दुकानातून मद्याच्या काही बाटल्या उचलल्या आहेत. त्याचप्रमाणे मोबाईल दुकानातून अंदाजे दोन-तीन हजार रुपये आणि काही मोबाईल संच, अश्विनी फार्मसीतून अंदाजे १० हजार रुपये त्यांनी पळविले असावे, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला.
टाळेबांदीनंतर बाजारात विशेष खरेदी होत नाही. सगळ्यांचाच आर्थिक कणा मोडलेला असल्यामुळे कोणत्याही दुकानात मर्यादेतच व्यवहार होत आहेत. त्यामुळे सहा दुकाने फोडूनही चोरट्यांच्या हाती विशेष काही लागले नाही, पण माशेलात बऱ्याच दिवसांनंतर मोठ्या प्रमाणात दुकाने फोड्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. ही सुरवात असावी. भविष्यात असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुकानमालकांबरोबरच ग्रामस्थांनीही सतर्क राहाणे गरजेचे आहे. तसेच पोलिसांनाही रात्रीच्या वेळी गस्त घालावी लागेल, असे मत माजी सरपंच प्रताप वळवईकर यांनी व्यक्त केले.

‘पोलिसांची रात्रीची नियमित गस्त हवी’
माशेलात पोलिस चौकी असूनही रात्री गस्त घातली जात नाही. त्यामुळे बाजारात सगळीकडे सामसूम असते. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला असावा. यापूर्वीही अशा चोऱ्या माशेलात अनेक वेळा झाल्या आहेत. भविष्यात परिसरातील उपनगरातसुद्धा अशा चोऱ्या होण्याची शक्यता आहे. तेव्हा पोलिस व जनतेनेही सतर्क राहायला हवे. परिसरात बांगलादेशी नागरिकांचे प्रकरण, गांजा विक्रीची प्रकरणे घडत आहेत. अशा परिस्थितीत या परिसरात ग्रामस्थांना सुरक्षितता, बाजाराचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त ठेवावी, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com