...तर आंदोलन आणखी तीव्र करणार

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कोळसा वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर काल चांदोर भागात होणाऱ्या रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाच्या कामास विरोध करण्यासाठी ‘गोंयात कोळसो नाका’ संघटनेने आयोजित केलेल्या आंदोलनात पाच हजारच्या वर गोमंतकीय जनतेने जमून हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी केले, तर आता ९ नोव्हेंबर रोजी दवर्ली येथे रेल्वे दुपदरीकरणाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे न घेतल्यास याहून दुप्पट लोक जमणार व हे आंदोलन आणखी तीव्र होणार, असे ‘गोंयात कोळसो नाका संघटने’चे अध्यक्ष अभिजित प्रभुदेसाई यांनी सांगितले. 

सासष्टी : कोळसा वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर काल चांदोर भागात होणाऱ्या रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाच्या कामास विरोध करण्यासाठी ‘गोंयात कोळसो नाका’ संघटनेने आयोजित केलेल्या आंदोलनात पाच हजारच्या वर गोमंतकीय जनतेने जमून हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी केले, तर आता ९ नोव्हेंबर रोजी दवर्ली येथे रेल्वे दुपदरीकरणाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे न घेतल्यास याहून दुप्पट लोक जमणार व हे आंदोलन आणखी तीव्र होणार, असे ‘गोंयात कोळसो नाका संघटने’चे अध्यक्ष अभिजित प्रभुदेसाई यांनी सांगितले. 

‘गोयात कोळसो नाका’ संघटनेने आयोजित केलेल्या या आंदोलनाला विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला असल्याने काल मोठ्या प्रमाणात लोक चांदोर भागात जमले होते. आंदोलनकर्त्यांनी चांदोर रेल्वे फाटकापर्यंत मेणबत्ती रॅली काढून निषेध व्यक्त केला व रॅलीत सहभागी झालेल्या लोकांनी चांदोर चर्च ते चांदोर रेल्वे फाटकापर्यत येऊन रेल्वे रुळावर ठाण मांडली. सकाळपर्यंत हे विरोधकर्ते याठिकाणी ठाण मांडून बसल्याने पाच तास रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. चांदर परिसरात मोठ्या संख्येने लोक जमल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल्याने याठिकाणी रात्री उशिरा पोलिसांना तैनात करण्यात आले.  

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी चांदोर रेल्वे क्रॉसिंग बंद करून रुळाचे दुपदरीकरण करण्याचा घेतलेला आदेश मागे घ्यावा अशी मागणी करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश मागे न घेतल्याने दुपदरीकरणाचे काम बंद पाडण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. चांदर परिसरात जमलेल्या गोमंतकीयांनी शांततापूर्वक हे आंदोलन पार पडल्याने आधीच गोमंकीयांचा विजय झाला आहे. रेल्वे दुपदरीकारणाच्या विरोधात गोमंतकीय पेटून उठल्याचे संकेत काल झालेल्या आंदोलनाद्वारे स्पष्ट झाले असून गोव्याचा सांभाळ करण्यासाठी यापुढेही समर्थन देणार, असे अभिजित प्रभुदेसाई यांनी सांगितले. 

रेल्वे दुपदरीकरणाचा विरोध करण्यासाठी गोमंतकीय नागरिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत, पण सरकारला याचे काहीही पडलेले नाही. गोवा सरकारला केलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार असून ९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी दवर्ली येथे रेल्वे दुपदरीकरणाचे काम करण्यासाठी दिलेला आदेश मागे न घेतल्यास याहून दुप्पट लोक 
जमून विरोध करणार, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. चांदर परिसरात रेल्वे दुपदरीकरणाचे काम करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घेण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते, तर आता दवर्ली येथे काम करण्यास दिलेला आदेश मागे घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनकर्त्यांच्या जोरदार घोषणा
रेल्वे दुपदरीकरणाच्या विरोधकर्त्यांनी चांदर येथील रेल्वे रुळावरच ठाण मांडल्याने रेल्वेला या रुळावरून ये जा करण्यास मिळावे यासाठी पोलिसांनी उपस्थित विरोधकर्त्यांना मार्ग मोकळा करण्याची सूचना केली, पण नागरिकांना घोषणाबाजी करीत राहून या रेल्वे मार्गावरून येणाऱ्या रेल्वेसाठी मार्ग मोकळा केला नाही.

संबंधित बातम्या