...तर कामगारांना गोव्यात तात्काळ प्रवेश मिळेल

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

सिंधुदूर्गच्या शिष्टमंडळाला गोवा सरकारचे आश्वासन

पेडणे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील व्यक्तींना गोव्यात कामासाठी जायचे असेल, तर त्यांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक राहील. अहवाल नकारात्मक आल्यास २४ तासाच्या आत, त्या व्यक्तीला गोव्यात येण्यासाठी पास देण्यात येईल. ज्यांना जिल्ह्यातून गोव्यात ये-जा करायची आहे त्यांच्याबाबतचा निर्णय ३१ मे नंतर सरकारी पातळीवर घेण्यात येणार आहे, यासाठी सिंधुदूर्गमधील गोव्यात खासगी कंपनीत कामाला असणाऱ्या सर्व युवक-युवतीच्या नावांची गावनिहाय यादी गोवा शासनाला द्यावी. जेणेकरून कोरोना चाचणी घेऊन सर्वांना नोकरीत सामावून घेणे शक्य होईल, असे आश्वासन गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव अशोक कुमार व उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी पत्रादेवी येथील बैठकीत दिले. ही बैठक गोवा व सिंधुदूर्ग भाजपा मंडळाने आयोजित केली होती.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील गोव्यात कामाला जाऊ पाहत असलेल्या युवक-युवतींना गोव्यात प्रवेश देण्याबाबत आज महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे गोव्यातील वरिष्ठ अधिकारी व सिंधुदूर्ग भाजपच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी भाजपचे कणकवली आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, प्रांतअधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक, जि. प. उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, बांदाचे सरपंच अक्रम खान, गोव्याचे मुख्यमंत्र्यांचे सचिव अशोक कुमार, जिल्हाधिकारी आर. मेनका, भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष संदानंद तानावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर, सतिश धोंड, पेडणे मामलेदार गौतमी परमेकर, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदेश चोडणकर, तोरसेचे माजी सरपंच बबन डिसोझा जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांनी गोव्यात खासगी कंपनीत काम करणाऱ्या जिल्ह्यातील युवक-युवतींच्या भावना गोवा शासनाकडे मांडल्या. नियमानुसार गोव्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला पेड क्वारंटाईन करण्यात येते. त्याचा खर्च संबंधित व्यक्तीला करावा लागतो. हा खर्च शासनाकडून किंवा संबंधित खासगी कंपनीकडून करण्याबाबत चर्चा करण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आल्यास २४ तासांत व्यक्ती कामावर रुजू होऊ शकते. तशा सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात येतील, असे आश्वासन अशोक कुमार यांनी दिले.
राजन तेली म्हणाले, सिंधुदूर्ग जिल्ह्यात गोव्यात काम करणारे सात हजारांहून अधिक व्यक्ती आहेत. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यासाठी व अहवाल येण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे. त्याबाबत ठोस उपाय योजना गोवा शासनाने करण्याची मागणी केली. त्यावेळी बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये एका दिवसांत एक हजार स्वॅबचा अहवाल देऊ शकतो. त्यामुळे सर्वांची कोरोना चाचणी घेऊन तत्काळ अहवाल देण्यात येणार असल्याचे गोवा प्रशासनाने स्पष्ट केले.
माजी सरपंच बबन डिसोजा यांनी गोव्यात येणाऱ्या कामगारांची आवश्यक ती तपासणी करूनच त्यांना गोव्यात प्रवेश द्यावा, सरकारच्या कुठल्याही निर्णयाने सीमेवरील नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी सूचना केली. या सुचनांवर येत्या ३१ मे पर्यंत तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिले.
 

संबंधित बातम्या