...तर शुभम गावडे वाचला असता 

लक्ष्मण ओटवणेकर
रविवार, 9 ऑगस्ट 2020

गावडेवाडा-मांद्रे येथील २६ वर्षीय शुभम शंकर गावडे याला जर तातडीने रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली असती तर शुभम वाचू शकला असता. ह्या दोन्ही गोष्टी वेळेवर उपलब्ध न झाल्यानेच शुभमला जीव गमवावा लगला, असा दावा स्व. शुभमच्या कुटुंबियांनी केला आहे.

तेरेखोल
गावडेवाडा-मांद्रे येथील २६ वर्षीय शुभम शंकर गावडे याला जर तातडीने रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली असती तर शुभम वाचू शकला असता. ह्या दोन्ही गोष्टी वेळेवर उपलब्ध न झाल्यानेच शुभमला जीव गमवावा लगला, असा दावा स्व. शुभमच्या कुटुंबियांनी केला आहे. ‘कोविड’च्या छायेखाली शुभमच्या मृत्यू झाल्यामुळे सर्व चाचण्या करून मृतदेह मिळविण्यासाठी २४ तासांहून अधिक काळ वाट पाहावी लागली असल्याची माहितीही कुटुंबियांनी दिली. 
याबाबत माहिती अशी की, शुभमला कामाच्या ठिकाणी थोडीफार दुखापत झाली होती. त्यामुळे शुभम त्या दिवशी कामावरून लवकर घरी आला. गावातील स्थानिक डॉक्टरकडे जाऊन तपासणी केल्यानंतर दुसऱ्यादिवशी दिवसभर त्याला बरे वाटू लागले. पण, नंतर संध्याकाळी छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्याच्या शेजारी राहणारे जयेश नानोस्कर यांनी शुभमला तातडीने तुये शासकीय आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉ. बाबू केरकर यांनी शुभमवर उपचार सुरू करून सलाईन लावले. यावेळी जयेश व शुभमच्या परिवारातील रुग्णालयाच्या लोक वार्डाबाहेर थांबले होते. काही वेळानंतर डॉ. बाबू केरकर यांनी जयेशला आत बोलावून त्याची तब्येत गंभीर असल्याने त्याला म्हापसा येथे जिल्हा (आझिलो) इस्पितळात न्यावे लागणार असल्याचे सांगितले. रुग्णवाहिका मागविण्यासाठी डॉक्टरांनी स्वतः फोन केला होता. मात्र, संध्याकाळी सात ते रात्री ९.४५ पर्यंत रुग्णवाहिका पोहचू शकली नाही. शेवटी ९.४५ च्या दरम्यान रुग्णवाहिका तुये आरोग्य केंद्रात पोचल्यानंतर शुभमला म्हापसा जिल्हारुग्णालयात हलविण्यात आले. 
दरम्यान, शुभम तुये आरोग्य केंद्रात असताना त्याची चौकशी केली तेव्हा त्याने आपण वेर्णा येथे कामाला असल्याचे सांगताच शुभम असलेल्या त्या प्रभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वागण्यात बदल केला. शुभमला मदत करण्यास ते पुढे सरसावले नाहीत. शेवटी जयेश नानोस्कर व शुभमच्या कुटुंबियांनी मदत करून शुभमला रुग्णवाहिकेत घातले. म्हापसा येथील आझिलो हॉस्पिटलात नेल्यानंतर पुन्हा तेथून शुभमला बांबोळी येथे नेण्यास सांगितले. त्यानंतर बांबोळी येथे शुभमवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची सूचना करण्यात आली.त्यानंतर शुभमच्या कुटुंबियांनी हात जोडून विनंती केल्यानंतर अंहप्रयत्न करतो, असे सांगितले गेले. शुभमला ११३ वार्डामध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्याचे निधन झाले. संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेला हा एकूण प्रकार मध्यरात्री बाराच्या दरम्यान संपला. मृत्यू झाल्यानंतर ‘कोविड-१९’ची टेस्टची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळजवळ २४ तासांहून अधिक काळ सर्वाना ताटकळत राहावे लागले. त्यानंतर शुभमला ‘कोविड’ची लागण झाली काय? अशी चर्चा सुरू झाली. मात्र, दोन्ही अहवाल नकारार्थी आल्याचे स्व. शुभमच्या कुटुंबियांनी माहिती देताना सांगितले. 
स्व. शुभम हा सर्वात मोठा मुलगा, आई व आणखी एक लहान भाऊ असा परिवार आहे. घराची सर्व जबाबदारी शुभमवरच होती. दोन्ही भाऊ लहान असतानाच वडिलांचे निधन झाले होते. एक मनमिळाऊ, होतकरू, कष्टकरी युवक अकाली गेल्याने येथील गावडेवाडा प्रभागांत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या

Tags