राज्यात नवीन एकही प्रकल्प नाही; वनीकरणासाठी तरतूद, वन्यप्राण्यांसाठीही वेगळे मार्ग

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

 राज्यात कोणताही नवा प्रकल्प येत नसून असलेल्या प्रकल्पांचा विस्तार मात्र केला जात असल्याचे समजले. लोहमार्ग सध्या एकेरी आहे तो दुहेरी केला जाणार, महामार्ग सध्या अस्तित्वात आहे तो रुंद केला जाणार आणि असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला समांतर अशा दुसऱ्या वीजवाहिन्या घातल्या जाणार आहेत.​

पणजी- मोले येथील अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानात तीन प्रकल्प येणार आणि सर्व पर्यावरणाचा ऱ्हास होणार, हजारो झाडांची कत्तल होणार, असा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. मात्र, तेथे जाऊन माहिती घेतल्यावर कोणताही नवा प्रकल्प येत नसून असलेल्या प्रकल्पांचा विस्तार मात्र केला जात असल्याचे समजले. लोहमार्ग सध्या एकेरी आहे तो दुहेरी केला जाणार, महामार्ग सध्या अस्तित्वात आहे तो रुंद केला जाणार आणि असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला समांतर अशा दुसऱ्या वीजवाहिन्या घातल्या जाणार आहेत.

या तिन्ही प्रकल्पांसाठी मोले व कुळे परिसरात कोणतेही नवे बांधकाम होणार नाही. केवळ रस्ता रुंदीकरणासाठी लागणारी आणि दुहेरी लोहमार्गासाठी लागणारी जागा वापरली जाणार आहे. जास्तीची जमीन संपादीत लागू नये यासाठी सध्या असलेल्या लोहमार्गाला समांतर असाच दुसरा लोहमार्ग घातला जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला लोहमार्ग हा १९०० साली घालण्यात आला आहे. याचा अर्थ १२० वर्षांनी लोहमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. देशात गेल्या दशकातच सार्वत्रिकपणे लोहमार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले मात्र लोंढा ते वास्को दुपदरीकरण रखडले आहे. सध्या या मार्गावरील चढणी व उतरणीवेळी तीन तीन इंजीन आगगाडीला लावावी लागतात. दुपदरीकरणासह विद्युतीकरण होणार असल्याने डिझेलचा धुरही रेल्वेच्या इंजिनातून बाहेर पडणार नाही आणि त्यामुळे प्रदूषणात घट होईल.
मोले अभयारण्यातून जाणाऱ्या लोहमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. हा मार्ग हॉस्पेट तिनईघाट वास्को असा असून याविषयीचा प्रस्ताव रेल विकास निगम लि. या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कंपनीने सादर केला आहे. तिनईघाट, कॅसलरॉक करंझोळ लोहमार्गाचे दुपदरीकरण हा प्रकल्प हॉस्पेट तिनईघाट कुळे वास्को लोहमार्गाच्या दुपदरीकरणांतर्गत येतो. सध्याचा लोहमार्ग हा एकेरी असून तो १९०० साली घालण्यात आला होता. हॉस्पेट या औद्योगिक भागाला मुरगाव बंदराशी जोडण्यासाठी हा लोहमार्ग घालण्यात आला होता. गोवा आणि कर्नाटकातील पर्यटन स्थळे जोडण्याचाही हेतू त्यावेळी लोहमार्ग घालताना ठेवण्यात आला होता.

औद्योगिक विकासामुळे या लोहमार्गावरील वाहतूक वाढली असून त्याची धारण क्षमता संपली आहे.  भविष्यकालीन विकास, प्रवासी रेल्वेंची वाढती मागणी आणि माल वाहतुकीसाठी असणारा वाव लक्षात घेता या मार्गाचे दुपदरीकरण केले गेले पाहिजे. जास्त भू संपादन करावे लागू नये यासाठी सध्याच्या एकेरी लोहमार्गाच्या बाजूलाच दुसरा लोहमार्ग घालण्यात येणार आहे. त्यामुळे जास्त वृक्षतोडही करावी लागणार नाही, अशी माहिती मिळाली.

या प्रकल्पाचा फटका वन्यजिवांना बसू नये यासाठी पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालात नमूद केल्यानुसार लोहमार्गाच्या खालून आणि वरून वन्यप्राण्यांना ये जा करण्याची व्यवस्था, अहवालातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येणार आहे. याशिवाय पर्यावरणाचा होणारा संभाव्य ऱ्हास पूर्ववत करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या तीन टक्के रक्कम रेल विकास निगम लि. ही कंपनी वन खात्याकडे जमा करणार आहे. यातून जंगलावरील मानवाचे अवलंबित्व घटवण्यासाठीच्या उपयायोजनाही हाती घेण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या नामांकित संस्थेने तयार केल्याने त्याविषयीही संशय घेण्यास जागा नसल्याचे दिसते.

लोहमार्ग दुपदरीकरणासाठी २७६.७८ हेक्टर वनक्षेत्र लागणार आहे. त्याबदल्यात वनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी हेक्टरी ९ लाख रुपये प्रकल्प प्रवर्तक कंपनी जमा करणार आहे.

रस्ता रुंदीकरणासाठी केवळ ११.१० हेक्टर जमीन

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने सादर केला आहे. या महामार्ग रुंदीकरणासाठी भगवान महावीर अभयारण्यातील ३१.०१ हेक्टर जमीन लागणार असली तरी प्रत्यक्षात रस्ता रुंदीकरणासाठी ११.१० हेक्टर जमिनच वापरली जाणार आहे. उर्वरित १९.९१ हेक्टर वन खात्याला परत केली जाणार आहे. आता हा महामार्ग रुंद केला की पुढील वीस वर्षे तो पुन्हा रुंद करावा लागणार नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या दुपदरी महामार्गाच्या बाजूलाच हे रुंदीकरण केले जाणार आहे. गोवा आणि कर्नाटकाला जोडण्यात राष्ट्रीय महामार्ग ४ अ महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेषतः पर्यटकांची  
मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर रहदारी असते. सध्या दुपदरी रस्ता असल्याने पर्यटकांच्या वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी, पर्यटकांना दोन्ही राज्यांमध्ये कोणत्याही अडथळ्याविना (वाहतूक कोंडी आदी) राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला आहे. सध्या ७ हजार ४६४ वाहने या रस्त्यावरून ये जा करतो. २०४० मध्ये या रस्त्यावरून २५ हजार ५२८ वाहने धावतील असे गृहीत धरून हे रुंदीकरण करण्यात येणार आहे. याचा अर्थ महामार्गाचे आता रुंदीकरण केल्यावर आणखीन वीस वर्षे रुंदीकरण करावे लागणार नाही. रुंदीकरण केल्यावर आताचा दुहेरी मार्ग हा एकेरी म्हणून तर नवीन दुहेरी मार्ग एकेरी मार्ग म्हणून वापरता येणार याशिवाय वळणे कापून काढता येणार यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि अपघाताची शक्यताही कमी होणार आहे. या महामार्गावरून वाहनांचा वेग वाढल्यावर वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडताना त्रास होऊ नये यासाठी तीन ठिकाणी महामार्गाच्या खालून तर एका ठिकाणी महामार्गाच्या वरून वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्याची सोय करण्यात येणार आहे. पर्यावरण पूर्ववत करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या तीन टक्के रक्कम वापरली जाणार असून प्रकल्प प्रवर्तक ते ती वनखात्याकडे जमा करणार आहेत. या प्रकल्पाच्या बदल्यात १८६.९० हेक्टरवर वनीकरण केले जाणार आहे. यासाठी प्रकल्प प्रवर्तक हेक्टरी ९ लाख रुपये खर्चही करणार 
आहेत.

 

संबंधित बातम्या