दिवाळीनिमित्त आनंददायी वृत्त

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

दीपोत्सव म्हणजे दीपावली सणास काल रोहिणी एकादशीपासून सुरवात झाली. आज वसुबारस दिवाळीस सुरवात झाली आणि आनंदाची बातमी म्हणजे गेल्या चोवीस तासांत एकाही रुग्णाचा कोविडची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला नाही. गेल्या पाच महिन्यात प्रथमच हे असे घडले आहे.

पणजी: दीपोत्सव म्हणजे दीपावली सणास काल रोहिणी एकादशीपासून सुरवात झाली. आज वसुबारस दिवाळीस सुरवात झाली आणि आनंदाची बातमी म्हणजे गेल्या चोवीस तासांत एकाही रुग्णाचा कोविडची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला नाही. गेल्या पाच महिन्यात प्रथमच हे असे घडले आहे.

राज्यात एप्रिलपासून कोविडचे रुग्ण सापडणे सुरू झाले होते, तरी पहिल्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद २२ जून रोजी झाली होती. त्यानंतर गेले पाच महिने दररोज कोविड रुग्ण दगावत होते. आतापर्यंत राज्यात ६५६ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसुबारशीच्या दिवशी आलेली ही बातमी गोवेकरांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी सुखकर करणारी आहे. 

दरम्यान, राज्याचा कोविडमधून बरे होण्याचा दरही ९४.७७ टक्के इतका सुधारला आहे. गेल्या चोवीस तासात १०७ लोकांना कोरोनाची लागण झाली, तर १९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या एक हजार सातशे अठ्ठावीस इतके कोविडचे सक्रिय रुग्ण आहेत. 

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात खाटांची संख्या २७५ असून सध्या १८८ खाटा वापरासाठी उपलब्ध आहेत, तर दक्षिण गोव्यात २३२ खाटांची संख्या असून सध्या २०१ खाटा उपलब्ध आहेत.
आज दिवसभरात ५५ लोकांनी गृह अलगीकरणाचा पर्याय स्वीकारला, तर ३२ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात एक हजार तीनशे अकरा इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले. 
डिचोली आरोग्य केंद्रात ५१, म्हापसा आरोग्य केंद्रात ७८, पणजी आरोग्य केंद्रात ९९, चिंबल आरोग्य केंद्रात ७६, पर्वरी आरोग्य केंद्रात ८३, मडगाव आरोग्य केंद्रात १४२, कुडतरी आरोग्य केंद्रात ५६, फोंडा आरोग्य केंद्रात १५५, पर्वरी आरोग्य केंद्रात ८३ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या