राज्यपालांच्या बदलीमागे षडयंत्र नाही

Santosh Govekar
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

मेघालयात बदली करण्यात आलेले राज्यपाल सत्यपाल मलिक एकेकाळचे ज्येष्ठ राजकारणी असल्या कारणामुळे त्यांना गोव्यातील राजकीय प्रवाहात राहाणे पसंत पडायचे. एरव्ही ते एक चांगले व्यक्तीमत्व होते. आपण त्यांना सुयश चिंतितो, असे कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुट येथे सांगितले.

शिवोली

मंगळवारी सकाळी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते लोबो बोलत होते. दरम्यान, राज्यपाल मलिक यांच्या बदलीमागे कुठल्याही प्रकारचे छडयंत्र नसल्याचा निर्वाळा त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिला.
हल्लीच्या दिवसांत हडफडे तसेच वागातोरच्या किनारी भागात रेव्ह पार्ट्याचे आयोजन झाल्याने याबाबतीत आपण स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यापुढे अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींवर लगाम ठेवण्यासाठी किनारी भागातील घटनांची दैनंदिन नोंद ठवणे आवश्यक असल्याचे लोबो यांनी पुढे सांगितले.
किनारी भागातील विवादास्पद पोलिस अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली करण्याची मागणी करीत शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांच्यातर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एक निवेदन लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हणजुणचे पोलिस निरीक्षक या भागात नवीन पोलिस अधिकारी आहेत. मात्र, हणजुण पोलिस स्थानकात दर पाच सहा महिन्यांनी वारंवार आपली बदली करून घेत याच भागात तळ ठोकून राहाणाऱ्या विवादास्पद पोलिस अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक असल्याची लोबो यांनी मागणी केली.
राज्यातील अमलीपदार्थांची देवाण घेवाण तसेच चोरी छुपे होत असलेल्या रेव्ह पार्ट्या तसेच संबंधित अनैतिक व्यवहारांना आळा घालण्यासाठी यापुढे सरकारचे गृह खाते, पोलिस दल, तसेच स्थानिक आमदार, स्थानिक सरपंच आदींनी एकत्रित येत या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याची नितांत आवश्यकता असल्याचे लोबो यांनी शेवटी सांगितले.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या