Covid-19 Goa: गोमंतकीयांच्या जीवाशी खेळ सुरूच; गिरीश चोडणकर यांचे गभीर आरोप

दैनिक गोमंतक
मंगळवार, 8 जून 2021

अतिदक्षता विभागात ‘इंटेसिवीस्ट’ नसल्याची धक्कादायक माहिती

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (Goa Medical College) अतिदक्षता विभागात ‘इंटेसिवीस्ट’ नसल्याची धक्कादायक माहिती अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी उघड केल्याने गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील संवेदनशील व बेजबाबदार भाजप सरकारने शेकडो निष्पाप रुग्णांचे बळी गेल्यानंतरही लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे, असा गंभीर आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. (There is no Intensivist in the intensive care unit of Goa Medical College)

चोडणकर यांनी नमूद केले आहे, की ऑक्सिजनचा पुरवठा बंद करून कोविड रुग्णांचे बळी घेणाऱ्या भाजप सरकारने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) व आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांच्यात वाद तयार झाल्याने अजूनही गोमेकॉतील ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित केलेला नाही. या प्रकल्पासाठी लागणारा कॉंम्प्रेसर विकत घेताना त्या पुरवठादाराकडून किती रक्कम घ्यायची याबाबत एकवाक्यता होत नसल्याने तो कॉम्प्रेसर-बॅकच्या रकमेची वाटणी करण्यात मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांमध्ये एकवाक्यता होत नसल्याने तो कॉम्प्रेसर अजूनही गोमेकॉत पोचलेला नाही.

इंटिझिव्हिस्ट म्हणजे काय? 

इंटिझिव्हिस्ट एक फिजिशियन असतात जे गंभीरपणे आजारी रूग्णांच्या काळजीत अतिदक्षता विभागात काम करत असतो.

गोव्यातील धक्कादायक प्रकार! 67 जणांच्या मृत्यूची माहिती 9 महिन्यांनंतर झाली उघड

सरकारचा बेजबाबदारपणा...

मुख्यमंत्र्यांनी 25 एप्रिल रोजी तो ऑक्सिजन प्रकल्प 15 मे 2021 पर्यंत कार्यांवित करणार असल्याचे जाहीर केले होते. आता 15 जूनची तारीख जवळ येत चालली तरी सरकार तो प्रकल्प सुरू करू शकलेले नाही. ‘कोविड’चे संकट समोर असताना, तसेच तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असताना भाजप सरकार अतिदक्षता विभागाची देखरेख ठेवण्यासाठी त्या डॉक्टरचे वेतन परवडत नाही म्हणन ‘इंटेसिवीस्ट’ची नेमणूक करीत नाही. भाजप सरकारकडे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्मृतीस्थळ बांधण्यासाठी 10 ते 15 कोटी रुपये आहेत, परंतु लोकांच्या आरोग्यासाठी एक इंटेसिव्हीस्ट नेमणे सरकारला परवडत नाही यावरुन या सरकारचा बेजबाबदारपणा दिसतो.

कॉंग्रेसने भ्रष्टाचार उघड केल्याने आरोग्यमंत्री गप्प

कोविड आजारावर खबरदारीचा उपाय म्हणून आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर, होम आयसोलेशन किटमधील नादुरूस्त ऑक्सिमीटर व कमी औषधे यावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे गप्प आहेत. कॉंग्रेस पक्षाने यात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचे उघड केल्यानेच आरोग्यमंत्र्यांची वाचा बंद पडली आहे, असा दावा चोडणकर यांनी केला आहे. गोमेकॉतील ऑक्सिजन पुरवठा व दगावलेले रुग्ण यांची चौकशी करण्यासाठी सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिम्मत असेल तर जाहीर करावा, असे उघड आव्हान देऊन त्यांनी म्हटले आहे, की सरकारने लोकांच्या जीवाशी व भावनांशी खेळणे बंद करावे.

संबंधित बातम्या