विद्याप्रसारकच्या इमारतीसाठी निधीची कमतरता भासली नाही

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

इमारत व मल्टीपर्पज सभागृहाच्या वास्तूप्रवेश कार्यक्रमात प्रा. चंद्रकांत हेदे यांचे प्रतिपादन

शिरोडा: पारदर्शी व्‍यवहार, निःस्वार्थी वृत्ती आणि प्रामाणिकपणे कार्य करून समाजात काहीतरी भव्यदिव्य घडविण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने सत्यसृष्टीत उतरतात. ज्ञानदानाचे अव्याहतपणे कार्य करण्याचा वसा घेऊन या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करताना देणगीदारांकडून निधीची कमतरता कधीच भासली नाही, असे प्रतिपादन वजनगाळ - शिरोडा येथील आदर्श विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत हेदे यांनी केले.

आदर्श विद्याप्रसारक मंडळ या शिरोड्यातील शैक्षणिक संस्थेतर्फे वजनगाळ - शिरोडा या ग्रामीण परिसरात आदर्श विद्याप्रसारक मंडळ उच्च माध्यमिक विद्यालयासाठी सुमारे ९० लाख रुपये खर्चून बांधलेल्या चार मजली अद्ययावत टुमदार वास्तू आणि वास्तूच्या वर बांधण्यात आलेल्या मल्टीपर्पज सभागृहाच्या वास्तूप्रवेश समारंभाप्रसंगी काल प्रा. हेदे बोलत होते. 

या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून वास्तू विशारद व अभियंते दत्तप्रसाद शेणवी बोरकर संस्थेचे उपाध्यक्ष अभियंते पुंडलिक पारकर, सचिव महेश पारकर, विज्जवल प्रभुदेसाई, संदीप प्रभुगावकर, म्हाडू उर्फ राजू प्रभुगावकर, अभय प्रभू, संस्‍थेच्या व्यवस्थापिका स्मिता कामत, श्रेया गावणेकर, कमलाबाई हेदे हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास पाटील, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सय्यद सुलेमान, डॉ. गुडे हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक शशिकांत फडके, नीलेश शिरोडकर, विजय परूळेकर, शर्मिला गावणेकर आदी मान्यवर उपस्थित होत्या.

प्रा. चंद्रकांत हेदे म्हणाले, की संस्था आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच वजनगाळसारख्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सर्व सोयींनी युक्त अशी ही सुसज्ज इमारत बांधून ती विद्यार्थ्यांसाठी खुली केली आहे. या शैक्षणिक संस्थेच्या दोन हायस्कूलचा आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागतो याचे श्रेय शिक्षक वर्गाला जाते.

शैक्षणिक संस्थेच्या चांगल्या निकालाची परंपरा ही शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अथक  रिश्रमाची परिणीती आहे, असे प्रा. हेदे म्हणाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे दत्तप्रसाद शेणवी बोरकर म्हणाले, की या डॉ. गुडे हायस्कूल, तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे आणि या संस्थेचा इतिहास हा सुवर्णाक्षरांनी लिहावा लागणार आहे. या संस्थेची प्रगती पाहता ही संस्था गोव्यातील एक नामांकित संस्था गणली जात आहे.  ज्येष्ठ शिक्षक शशिकांत फडके यांनी या संस्थेची उत्तरोत्तर भरभराट होऊन या संस्थेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी सर्व क्षेत्रात तळपत राहत संस्थेचे नाव उज्वल करावे, असे सांगितले. वेदशास्त्रसंपन्न पांडुरंगशास्त्री काजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मवृंदांनी विधिवत वास्तूशांती आणि उदकशांती करण्यात आली, तर अभियंते दत्तप्रसाद शेणवी बोरकर यांच्या हस्ते व इतर पाहुण्यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून या वास्तूचे उद्‍घाटन करण्यात आले. इमारतीचे बांधकाम करून देणारे अभियंते दत्तप्रसाद शेणवी बोरकर यांचा पुष्प देऊन गौरव करण्यात आला. 

संबंधित बातम्या