भजनातील रागबदलात स्वैराचार नसावा

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

भारतीय रागदारी संगीतात रागबदल अगदीच क्वचितप्रसंगी केला जातो. मराठी नाट्यसंगीतातही असा रागबदल करण्याचे प्रमाण तसे फारसे नाही; पण, भावगीत गायनात मोठ्या प्रमाणात रागबदल करण्यात येतो.

भारतीय रागदारी संगीतात रागबदल अगदीच क्वचितप्रसंगी केला जातो. मराठी नाट्यसंगीतातही असा रागबदल करण्याचे प्रमाण तसे फारसे नाही; पण, भावगीत गायनात मोठ्या प्रमाणात रागबदल करण्यात येतो. गोमंतकीय भजन संगीतात रागबदल सर्वाधिक प्रमाणात केला जातो. भजनात ‘रागान्तर’ अर्थांत ‘रागबदल’ करण्याची गायकाला मुभा असली तरी राग बदलात स्वैराचार नसावा. त्याबाबतही नियमबद्धता, रूढ संकेत आहेत, याचे भान गायकाने ठेवणे क्रमप्राप्त आहे.

भजन, भावगीत, नाट्यगीत या गीत प्रकारांत मिश्र रागांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, असे कित्येक जण म्हणतात. परंतु, एखाद्या गीतासाठी दोन-तीन राग वापरले म्हणजे तो मिश्र राग होत नाही. त्यामुळे, मिश्र राग ही संकल्पना भजनात वापरणे चुकीचे आहे. गाण्याची प्रत्येक ओळ कोणत्या ना कोणत्या रागात निबद्ध असते. आपल्याला तो राग माहीत नसेल तेव्हा त्याला उगाच ‘मिश्र राग’ संबोधू नये. स्वतःचे अज्ञान लपवणारेच त्याला मिश्र राग संबोधत असतात.

भजनात रागबदल करण्याबाबत कोणतेही विशिष्ट बंधन नाही. रागबदल करताना त्याच थाटातील अन्य रागात किंवा दूरच्या वा अगदी भिन्न प्रकृतीच्या थाटातील रागातही जाता येते; पण, गायकाचा तेवढा अभ्यास हवा, हुकमत हवी आणि पुन्हा मूळ रागात यायची कुवतही हवी.

भैरवी रागात गाणे सुरू असताना रागबदल करायचा झाल्यास मालकंस रागात प्रवेश करता येतो; कारण, तो राग भैरवी रागाला जवळचा आहे. भजनात रागबदल करताना शक्यतो जवळच्या रागात प्रवेश करावा. तसे केल्यास ते कानांना गोड वाटते. उदाहरणार्थ, अमृतवर्षिणी रागातून मारुबिहाग, मधुकल्याण इत्यादी रागांत जाता येते; कारण, ते जवळचे राग आहेत. रागबदल करताना शक्यतो भिन्न प्रकृतीच्या रागांत जाऊच नये. उदाहरणार्थ, बिलावल थाटातील दुर्गा रागातून कल्याण थाटातील हिंडोल रागात प्रवेश केला तर ते गाणे तेवढेसे प्रभावी वाटणार नाही. त्याबाबत ठोस असा नियम नसला तरी रागान्तर (रागबदल) करताना हे भान भजन कलाकारांनी ठेवणे गरजेचे आहे.

पहाडी आवाजात अथवा मध्यम स्वरात (काळी चार स्वरात) गाण्यासाठी योग्य असलेले राग आपण जाणून घेतले पाहिजे. मध्यम स्वर म्हणजे काळी चार. अर्थांत मध्यम स्वर हा ‘सा’ (षड्‍ज’) स्वर असल्याचे मानून गायन करणे. विशेषतः पहाडी आवाज आवश्यक असलेल्या गीतांसाठी/ अभंगांसाठी तसेच गौळणींसाठी उपयुक्त असलेले राग आहेत. ते राग विशेषतः गौळण गायनासाठी सर्वाधिक वापरात आहेत. तसेच गौळण गायनासाठी मिश्र मानले जाणारेही राग वापरले जातात. उदाहरणार्थ ‘मिश्र काफी’. हे राग मध्यमामध्ये गायिल्यास ते कानांना अधिक गोड लागतात. पहाडी रागात साकी हा गीतप्रकार गायिल्यास तो उठावदार होतो. मराठी नाट्यसंगीतात साकी हा गीतप्रकार विपुलतेने प्रचलित आहे. तसेच, कीर्तनातही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाते. भजन संगीतात विशेषत: गौळण गायनात पहाडी रागाचा विपुलतेने वापर केला जातो.

प्रहरांनुसार रागांचे गायन करण्याचा संगीतशास्त्राचा नियम आहे. हे नियम पाळणे भजन कलाकारांना शक्य नाही. तथापि, काही वेळा आपणास शक्य असेल तर ते नियम अवश्य पाळावेत. उदाहरणार्थ, रामनवमी कार्यक्रमात दुपारच्या वेळी भजन सादर करण्याची संधी मिळाल्यास त्या वेळी दुपारच्या रागांत, उदाहरणार्थ सारंग रागात, भजन सादर करता येईल. अर्थांत, दुपारी बाराच्या सुमारास आम्ही ‘जय जय रामकृष्ण हरी’ हा गजर सारंग रागात सादर करू शकतो. भूप रागाचे मूळ नाव भूपाली/ भुपाळी आहे. भूपाळ्या सकाळच्या प्रहरी गातात. ‘भुपाळी’ हा गीतप्रकार आणि ‘राग भूपाली’ याबाबतचा फरक आपण समजून घेतला पाहिजे. भूपाली हा संस्कृत शब्द आहे, तर भुपाळी हे त्या शब्दाचेच मराठी भाषेतील रूप आहे. भुपाळ्या शक्यतो पहाटेच्या प्रहरीच गाव्यात असा संकेत आहे.

आपण सर्वसाधारणपणे सर्व राग-रागिण्यांना ‘राग’ या नावानेच ओळखतो. पण, या राग (नर) व रागिण्या (मादी) यांमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ, ‘दुर्गा’ हा राग नव्हे, तर ती ‘रागिणी’ (मादी) आहे, असे मानले जाते. सर्वसाधारणपे स्त्रीत्व दर्शवणाऱ्या रागांना ‘रागिण्या’ असे संबोधले जाते. भारतीय रागदारी संगीतातील विविध राग-रागिण्यांची नावे बघितली तर बहुतांश रागांची नावे व त्या रागांद्वारे उत्पन्न होणारी धुंदी यांत कोणताही अनुबंध नाही, हे प्रकर्षाने जाणवते; तथापि, काही मोजक्याच रागांची नावे व त्या रागांची धुंदी याबाबत पूर्णतः अनुबंध असल्याचे आढळून येते. उदाहरणार्थ, राग राग दीप:- तानसेनने हा राग गायिल्यानंतर दीप प्रज्वलित झाले होते, अशी आख्यायिका आहे. मेघमल्हार:- या रागाच्या गायनामुळे पर्जन्यवृष्टी होते असे मानले जाते. ज्या व्यक्तींनी त्या रागांची रचना/निर्मिती केली त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार त्यांना नावे दिली व नंतरच्या काळात ती नावे रूढ झाली.

काही वेळा एखाद्या जाणकाराने विशिष्ट रागाची रचना करून विशिष्ट नाव दिलेले असते व त्यानंतर अगदी त्याच रागाची दुसऱ्या ए्खाद्या जाणकाराने स्वत:च्या शैलीनुसार तसेच कल्पकतेनुसार रचना करून त्याला भलतेच नाव दिलेले असते. वास्तविक, त्या दोन रागांत कोणताही फरक नसतो; पण, केवळ त्यांच्या नावांत बदल असतो. तात्पर्य, रागाचे नाव कोणतेही असू द्या; ते महत्त्वाचे नाही, तर रागाची धुंदी महत्त्वाची आहे.

दुर्गा, बागेश्री, रागेश्री, जयजयवंती इत्यादी राग स्त्रियांच्या गळ्यांत अधिक गोड वाटतात, असे संगीत क्षेत्रात मानले जाते. काही रागांचे विविध उपप्रकार प्रचलित आहेत. उपप्रकार असले तरी त्यांना राग म्हणून स्वतंत्र स्थान प्राप्त झालेले आहे. उदाहरणार्थ, राग ‘मल्हार’मध्ये ‘मेघ मल्हार’, ‘मियां मल्हार’.; राग ‘भैरव’मध्ये ‘अहीर भैरव’ तसेच अन्य काही राग; राग ‘सारंग’मध्ये ‘वृंदावनी सारंग’, ‘गौड सारंग’ इत्यादी.

परंपरेने आलेली लोकगीते कोणत्या ना कोणत्या रागात बंदिस्त असतात; तथापि, त्या लोकगीतांची संगीतरचना रागांचा वापर करून हेतुत: करण्यात आलेली नाही. त्यांची संगीतरचना नैसर्गिक पद्धतीने झालेली आहे. या पारंपरिक लोकगीतांत राग महत्त्वाचा नसून बाज महत्त्वाचा असल्याचे प्रकर्षाने जाणवते. ही पारंपरिक लोकगीते तसेच जुने श्लोक व मंगलाष्टके यांच्या गायनाची विशिष्ट लकब आहे. ‘सा’, ‘प’ यासारख्या कायम/मूळ स्वरांचा त्यांच्या गायनात विपुलतेने वापर केला जात असल्याचे जाणवते.

संबंधित बातम्या