गोव्यातून सिंधुदुर्गात येताना छुप्या मार्गांचा वापर

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर बांदा येथे आजपासून थर्मल िस्क्रनिंग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

बांदा, पेडणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर बांदा येथे आजपासून थर्मल िस्क्रनिंग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. सीमेवर गोव्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची बांदा टोलनाका परिसरात महसुल, आरोग्य व पोलीस पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. आज दिवसभरात बारा तासात एक हजारहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली; मात्र आज एकही संशयित रुग्ण मिळाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

येथे आज सकाळी ७ वाजल्यापासून पर्यटकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक ये-जा रणाऱ्या वाहनांना यामधून सवलत देण्यात आली. आरोग्य विभागाचे ३ कर्मचारी, महसुल विभागाचे २ कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक व वाहतूक शाखेचे ३ कर्मचारी याठिकाणी २४ तास कार्यरत राहणार आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचे नंबर, व्यक्तिगत माहिती, महाराष्ट्र राज्यात प्रवास करण्याचे ठिकाणी याठिकाणी नोंद करण्यात येत आहे.

याठिकाणी सर्व पर्यटकांची थर्मल गन द्वारे तापमान तपासण्यात येत आहे. तापमान ९९ डिग्रीच्या वर असेल तर संबंधित व्यक्तीला कोरोना अँटिजेन टेस्ट करण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्याची सुविधा ठेवण्यात आली आहे. मात्र आज दिवसभरात एकही संशयित रुग्ण आढळला नसल्याची माहिती बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी दिली. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी ही तपासणी सटमटवाडी येथील टोलनाक्‍यावर होत आहे. याठिकाणी ३ मार्गिका वाहनांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. गोव्यातून राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने टोलनाक्‍यावर आज दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत ५०० हुन अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली होती. दुपारपासून सायंकाळच्या सत्रात देखील ५०० हुन अधिक वाहनांची तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

छुप्या मार्गांचा वापर
गोव्यातून सिंधुदुर्गात येताना महामार्गावर बांदा येथे आजपासून थर्मल स्कॅनिंग सुरू केले आहे. याठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वेळ लागत असल्याने अनेक वाहनचालकांनी गुगल मॅपचा आधार घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी छुप्या मार्गांचा अवलंब केला. यामुळे शेकडो पर्यटक व त्यांच्या वाहनांनी कोणताही अडथळा न येता प्रवेश केला. लॉकडाउन काळात महाराष्ट्र-गोवा सीमा सील असताना अनेक वाहनचालकांना छुप्या मार्गांची माहिती झाली आहे. त्यामुळे केवळ महामार्गावर थर्मल स्कॅनिंग करून शासनाचा उद्देश सध्या होईल का? हा प्रश्न आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या