खनिज परवान्यांचा मार्ग सुकर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

राज्यात सध्या रेती, खडी, चिरे राज्याबाहेरून आणावे लागतात. त्यामुळे स्वयंपूर्ण गोवा निर्माण करताना गौण खनिजेही स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावीत, यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भर दिला आहे.

 

पणजी: राज्यात सध्या रेती, खडी, चिरे राज्याबाहेरून आणावे लागतात. त्यामुळे स्वयंपूर्ण गोवा निर्माण करताना गौण खनिजेही स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावीत, यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भर दिला आहे. ही खनिजे काढण्यासाठी परवाने देण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी आज सायंकाळी उशिरा खाण खात्यात जाऊन प्रत्येक कर्मचाऱ्याशी संवाद साधला.

खाण खात्यात गेल्या १० दिवसांत मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही दुसरी भेट आहे. या भेटीवेळी राज्याचे मुख्य सचिव परीमल राय, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी उपेंद्र जोशी, खाण संचालक विवेक एच. पी. उपस्थित होते. खाण खाते हे महसूल प्राप्तीसाठी सरकारला महत्त्‍वाचे खाते असताना या खात्याकडून येणारा महसूल घटल्याचा फटका राज्याच्या तिजोरीला बसत आहे. लोह खनिज खाणी बंद असल्यामुळे स्वामित्वधन मिळत नाही. सध्या वाहतूक अधिभार तेवढा सरकारला खनिज वाहतुकीतून मिळत आहे. यामुळे महसूलवाढीच्‍या प्रयत्‍नांसाठी मुख्‍यमंत्र्यांनी खाण खात्‍याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात रेती, चिरे, खडीच्या खाणी बंद असल्यामुळे राज्याची गरज भागवण्‍यासाठी ही गौण खनिजे राज्याबाहेरून आणली जातात.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत घोषणेला स्वयंपूर्ण गोवा या घोषणेची जोड दिली आहे. त्याला अनुसरून या गौण खनिजांची राज्यातच उपलब्धता होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी हे परवाने देण्यातील अडचणी दूर कशा करता येतील, हे जाणून घेण्यासाठी थेट खाण खात्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी महसूल वाढीवाढी खाते काय करू शकते, गौण खनिज परवाने देण्यातील अडचणी कोणत्या आणि त्या कशा दूर करता येतील या मुद्यांवर चर्चा केली. 

कायदेशीर व्‍यवसायाला 
सतावणूक नको : मुख्‍यमंत्री

खाण खात्यात गौण खनिजे काढण्यासाठी (रेती, चिरे, खडी आदी) किती अर्ज आले. त्यातील किती मंजूर झाले. प्रलंबित अर्ज का राहिले.  ते मंजूर करण्यासाठी काय करता येईल, हेही मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले. मागच्या बैठकीवेळी ३ दशलक्ष मेट्रीक टन खनिज लोह खनिजाचा ई लिलाव पुकारण्याचे ठरवण्यातच आले होते. आजच्या बैठकीत गौण खनिज काढण्यासाठीचे परवाने तातडीने आणि प्राधान्यक्रमाने देण्याचे ठरवण्यात आले आहे. खाण खात्याने बेकायदेशीरपणा खपवून घेऊ नये, पण कायदेशीरपणे कोणी व्यवसाय करत असेल, तर त्याची सतावणूक केली जाऊ नये अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

संबंधित बातम्या