शिरोडा बाजारात चोरट्यानी फोडली आठ दुकान

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

चोरट्यांची टोळी वावरत असल्याचा संशय

शिरोडा: शिरोडा बाजारात काल (शनिवारी) रात्री अज्ञात चोरट्यांनी आठ दुकाने फोडून आतील काही ऐवज लंपास केला. चोरट्यांनी मोठी चोरी केली नसली तरी सुमारे पंचवीस हजार रुपयांचे सामान पळवले. 

चोरट्यांनी रोखड पळवण्यासाठी दुकाने फोडली असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे, मात्र त्यांना कोणत्याही दुकानातील रोखड पळवता आली नाही. सकाळी दुकाने उघडण्यासाठी दुकानदार आले असता, हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. 

याप्रकरणी फोंडा पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिस चोरट्यांच्या शोधात आहेत. 

या चोरीत चार जनरल स्टोअर्स, दोन हॉटेल व एक चिकन सेंटरचा समावेश आहे. शिरोडा बाजारात असलेल्या बाबूश वीर, संदीप नाईक, शांबा नीाक, नारायण नाईक यांच्या दुकानात तसेच अमिता जनरल स्टोअर्स, मीनाक्षी हॉटेल, हनुमान स्विटर मार्ट व एका चिकन सेंटरमध्ये ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी काही दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश केला. 

काही दुकानात मागील दरवाजा तोडून आत घुसले तर काही ठिकाणी छपराचे पत्रे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. पोलिस अधिक तपास करीत आहे. 

चोरट्यांची एखादी टोळी या भागात वावरत असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी सहा महिन्यांअगोदर शिरोडा बाजारात अशाच प्रकारे दुकाने फोडून चोरट्यांनी आतील ऐवज लंपास केला होता. 

त्यापूर्वी बोरी भागातील दोन दुकाने फोडली होती. त्यात एका हॉटेल किराणा दुकानाचा समावेश होता. दरम्यान, फोंडा पोलिसांनी चोरीचा छडा लावताना शिरोडा भागात पोलिस गस्त घालावी अशी मागणी शिरोडा पंचायतीचे सरपंच अमित शिरोडकर यांनी केली 
 

संबंधित बातम्या