शाळांनी वर्ग सुरू करण्यासाठी एकसंध निर्णय घ्यावा : गावकर

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

काणकोणमधील शाळा चालकांनी दहावी विद्यार्थ्याचे वर्ग नियमित सुरू करण्यासाठी एकसंघ निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शिक्षक ऑनलाईन वर्ग घेत आहेत, सुमारे तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी नेटवर्क समस्येमुळे वर्गाला हजेरी लावू शकत नाहीत, त्याचा अभ्यास पूर्ण होत नाही.

 

काणकोण: काणकोणमधील शाळा चालकांनी दहावी विद्यार्थ्याचे वर्ग नियमित सुरू करण्यासाठी एकसंघ निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शिक्षक ऑनलाईन वर्ग घेत आहेत, सुमारे तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी नेटवर्क समस्येमुळे वर्गाला हजेरी लावू शकत नाहीत, त्याचा अभ्यास पूर्ण होत नाही. अशा वेगवेगळ्या समस्यांना शिक्षकांना सामोरे जावे लागते. दहावी व बारावी परीक्षा अनिवार्य आहे. शाळा सुरू करणे गरजेचे आहे, परंतु योग्य खबरदारी घेणेही आवश्यक आहे, असे मत शांताजी गावकर यांनी व्यक्त केले. 

आज जे विद्यार्थी दहावीत आहेत, ते विद्यार्थ्यांना कोरोना महामारीमुळे सरळ दहावी वर्गात परीक्षा न घेता ढकलण्यात आले आहे. आता दिवाळी, नाताळ सुट्टीचे सुमारे बावीस दिवस गेल्यानंतर जानेवारी महिना उजाडणार आहे. काणकोणातील विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. शिक्षकांनी त्यांच्याकडून अभ्यास करून घेतल्याशिवाय पर्याय नाही, त्यासाठी किमान दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून शिकवणी घेण्याची अनुमती ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांना देण्याची मागणी पणसुले-कात्यायनी बाणेश्वर विद्यालय संस्थेचे अध्यक्ष शांताजी नाईक गावकर यांनी केली आहे.

त्यासाठी काणकोणमधील शिक्षण संस्थांच्या चालकांनी एका व्यासपीठावर येऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. श्री कात्यायनी बाणेश्वर विद्यालयाने दहावी विद्यार्थ्याच्या पालकांच्या दबावामुळे सोमवार पासून विद्यार्थ्याचे गट करून वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. यंदा दहावीच्या वर्गात ६१ विद्यार्थी आहेत त्यापैकी सुमारे ऐंशी टक्के पालकांनी विद्यार्थ्यांना वर्गात हजेरी लावण्यासाठी लेखी परवानगी दिली आहे. कोरोना महामारी काळातील सर्व नियम व निर्बंध पाळून हे वर्ग घेण्यात येत असल्याचे शांताजी नाईक गावकर यांनी सांगितले.
चाररस्ता येथील श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालयाने अकरावी विद्यार्थ्याचे नियमित वर्ग घेण्यासाठी पालकाची ऑनलाईन बैठक घेतली. हळूहळू काणकोणात नववी, दहावी, अकरावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे.

हे पाच महिने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले. मात्र ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन या समस्येमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक त्रस्त झाले आहेत. प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण व ऑनलाईन शिक्षण यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. क्रमाक्रमाने दहावी, बारावी नंतर अकरावी, नववी,आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण संस्था चालक, शिक्षक व पालकांनी मनाची तयारी करायला हवी. सर्वसमावेशक विचार करून विद्यार्थ्यासाठी शाळा सुरू करण्याची गरज आहे.
- व्यंकटराय नाईक, पैंगीण

संबंधित बातम्या