अतिमहनीय व्यक्तींना हजारभर पोलिसांचे सुरक्षा कवच

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

राज्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्री, न्यायमूर्ती, पोलिस अधिकारी, न्यायाधीश, विविध आयोगाचे अध्यक्ष याच्याव्यतिरिक्त काही महत्त्वाची सरकारी कार्यालये तेथे पोलिस सुरक्षा ठेवण्यात येत आहे. पोलिस खात्यातील सुरक्षा व एस्कॉर्ट तसेच संबंधित क्षेत्रातील पोलिस ठाणे येथील पोलिसांची वर्णी लावण्यात येते. त्यामुळे बहुतेक पोलिस ठाण्यात जो कर्मचारी वर्ग मंजूर केलेला असतो त्यातील २५ टक्के पोलिस हे अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेचे काम करत असतात.

पणजी- पोलिस खात्यामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असताना राज्यातील अतिमहनीय व्यक्तींसाठी सुमारे एक हजार पोलिसांचे सुरक्षा कवच दिले गेले आहे. 
गेल्या चार वर्षात पोलिस भरती झालेली नाही. त्यामुळे पोलिस खात्याला सुरक्षा व तपास कामगिरी पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय व खासगी निवासस्थानी ३१, पर्वरीतील विधानसभा संकुल येथे १०० तर दोनापावल येथील राजभवनवर १३५ पोलिस कार्यरत आहेत. 

राज्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्री, न्यायमूर्ती, पोलिस अधिकारी, न्यायाधीश, विविध आयोगाचे अध्यक्ष याच्याव्यतिरिक्त काही महत्त्वाची सरकारी कार्यालये तेथे पोलिस सुरक्षा ठेवण्यात येत आहे. पोलिस खात्यातील सुरक्षा व एस्कॉर्ट तसेच संबंधित क्षेत्रातील पोलिस ठाणे येथील पोलिसांची वर्णी लावण्यात येते. त्यामुळे बहुतेक पोलिस ठाण्यात जो कर्मचारी वर्ग मंजूर केलेला असतो त्यातील २५ टक्के पोलिस हे अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेचे काम करत असतात. पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने हल्लीच पोलिस खात्याने आयआरबी बटालियनच्या पोलिसांना गोवा पोलिस खात्यात विलीन होण्याची संधी उपलब्ध केली आहे. मात्र त्याला खात्यातील काही पोलिसांनी विरोध करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलिस खात्यात मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा सध्या सुमारे १२०० पोलिसांची उणीव आहे. 
राज्यातील अतिमहनीय व्यक्तींसाठी सुरक्षा कवच देण्यासाठी पोलिस खाते व आयआरबी बटालियन पोलिसांचा वापर केला जातो.

सध्या राजभवन येथे १३५, मुख्यमंत्र्यांसाठी ३१, मुंबई उच्च न्यायालयासाठी ५४, पर्वरी विधानसभा संकुलसाठी १००, उपमुख्यमंत्र्यांना प्रत्येकी ७ पोलिस तैनात करण्यात आले आहेत तसेच ७४ पोलिस राखीव ठेवण्यात आले आहेत. या सुरक्षा कवचसाठी ८ निरीक्षक, ९ उपनिरीक्षक, ३१ सहाय्यक उपनिरीक्षक, २०८ हवालदार, १५ महिला हवालदार, ६०१ कॉन्स्टेबल्स, ५ महिला कॉन्स्टेबल्स याचा समावेश आहे. पर्वरी संकुलाच्या ठिकाणी पोलिसांव्यतिरिक्त गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आलेले आहेत. प्रत्येक मंत्र्यांच्या निवासस्थानी व बंगल्यावर एका हवालदारसह चार पोलिस कॉन्स्टेबल्स चौवीस तास ड्युटीवर असतात. राज्यातील विविध न्यायालयाच्या इमारतीत न्यायाधीशांसाठी, सरकारी वकिलांसाठी, याव्यतिरिक्त आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांसाठी ‘पीएसओ’ उपलब्ध करण्यात येतात. 

राज्य पोलिस खात्यात सुमारे ५०५१ पोलिस कर्मचारी तर १२०८ गृहरक्षक मिळून ६२५८ कर्मचारी आहेत. त्यामध्ये उत्तर गोव्यात १५२८, दक्षिण गोव्यात १३९७, सीआयडी विभागासाठी ५६५, वाहतूक विभाग १०५७, एस्कॉर्ट कक्ष ८०, इतर विभागांसाठी ५१६, किनारपट्टी पोलिस विभागासाठी १६८ चक सीआयडी विशेष शाखेसाठी १७९ पोलिस सध्या काम करत आहेत. ज्या विभागामध्ये पोलिसांची कमतरता आहे तेथे गृहरक्षकांची वर्णी लावून ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या