गोव्यात येण्यास हजारो इच्छूक

Dainik Gomantak
शुक्रवार, 15 मे 2020

राजधानी एक्सप्रेसमधून ७२० जण येणार आहेत. त्यात बहुतांश बिगरगोमंतकीय आहेत. त्यांची येथे राहण्याची जेवणाची सोय नसताना ते कशासाठी येत आहेत हेच समजत नाही.

पणजी

राज्याबाहेरून व देशाबाहेरून गोव्यात येण्यासाठी १८ हजार २५३ जणांनी सरकारी यंत्रणेकडे संपर्क साधला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गोव्यात लोक आल्यावर त्यांना अलगीकरण करून ठेवणे, त्यांच्या कोविड चाचण्या करणे, त्यानंतर ते घरातच अलगीकरण करून राहतीलप याची खात्री करणे याचा मोठा ताण सरकारी यंत्रणेवर येणार आहे. आजवर राज्याबाहेरून तीन हजारहून जास्त जण सरकारी परवानगी घेऊन राज्यात आले आहेत. चोरवाटांनी आलेल्यांचा या आकडेवारीत समावेश नाही.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले, की इतर राज्यात अडकून असलेल्या ६ हजार २०० गोमंतकीयांनी राज्यात येण्यासाठी परवानगी मागितली आहे. इतर देशात विविध कामानिमित्त गेलेले पण टाळेबंदीनंतर तेथेच अडकून पडलेले अशा ८ हजार २११ गोमंतकीयांनी परवानगी तर विविध जहाजांवर ३ हजार ८४२ गोमंतकीय खलाशी आहेत. या साऱ्यांना गोव्यात यायचे आहे. ते गोव्यातील असल्याने त्यांना प्रवेश नाकारता येणार नाही. मात्र राजधानी एक्सप्रेसमधून ७२० जण येणार आहेत. त्यात बहुतांश बिगरगोमंतकीय आहेत. त्यांची येथे राहण्याची जेवणाची सोय नसताना ते कशासाठी येत आहेत हेच समजत नाही. शक्य झाल्यास रेल्वेचा गोव्यातील थांबाच रद्द करा अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला केली आहे. आज रेल्वेतून १७ जण आले त्यांची चाचणी नकारात्मक आल्याने त्यांना घरी अलगीकरण करून राहण्यासाठी जाऊ देण्यात आले.
अर्थव्यवस्था पुनर्जिवित करण्यासाठी विविध घटकांकडून आजवर १४७ शिफारशी आल्या आहेत. अजूनही गोवाऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नागरीक शिफारशी करू शकतील. त्यानंतर सरकार या शिफारशींचा अभ्यास करून व्यवहार्य शिफारशींची अंमलबजावणी करणार आहे. केंद्र सरकारने भरघोस अर्थसहाय्याची घोषणा केली आहे. राज्यातील विविध घटकांसाठी त्यातून कशी मदत करून घेता येईल याचा विचार करण्यासाठी उद्या (ता.१५) दुपारी ४ वाजता राज्य बॅकींग समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात यावर सविस्तर चर्चा होऊन त्यादिशेने सरकार पावले टाकेल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरल्यानुसार होतील असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर सांगितले. ते म्हणाले, कोविडचे सापडलेले रुग्ण हे राज्याबाहेरून आलेले होते. त्यांचा येथील समाजाशी संपर्क आलेला नाही. एक ट्रक चालक दोन ठिकाणी गेला होता. तेथे संपर्कात आल्याचा संशय असलेल्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांची चाचणी केली जाणार आहे. राज्याच्या सीमेवर प्रवाशांची तपासणी करणाऱ्यांना वैयक्तीक सुरक्षा कीट पुरवण्यात येणार आहे.

पाणीपट्टीत २०१५ नंतर वाढ करण्यात आली नव्हती. आताही ५० टक्के नव्हे तर १० टक्के वाढ करण्याचे ठरवले होते. एकंदरीत परिस्थिती व मागण्या पाहता हा निर्णय स्थगित करण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेल इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात स्वस्त आहे. त्यामुळे त्या कराबाबत फेरविचार केला जाणार नाही. 

संबंधित बातम्या