टाळेबंदीत डिचोलीत तिघांची आत्महत्या

dainik gomantak
मंगळवार, 19 मे 2020

आत्महत्या केलेल्या दोघांनाही दारुचे व्यसन होते. त्यातूनच दोघांनीही आत्महत्या केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

डिचोली, 

'कोविड' च्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेल्या 'टाळेबंदी' काळात डिचोलीत रस्ता अपघातांच्या प्रमाणावर बरेच नियंत्रण आले आहे. तर दुसऱ्या बाजूने डिचोली पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तीन विवाहितांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. मागील एप्रिल महिन्याच्या ९ तारखेला भाटले-मये येथे प्रशांत वळवईकर (वय-४०) याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर आठवडाभरातच म्हणजेच १५ तारखेला मधलावाडा -साळ येथे नारायण विठ्‌ठल नाईक (वय-४३) याने भाड्याच्या जागेत छपराला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या दोघांनाही दारुचे व्यसन होते. त्यातूनच दोघांनीही आत्महत्या केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तर मागील आठवड्यात १३ तारखेला म्हावळंगतड-साखळी येथे राहूल देसाई (वय-४६) याने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मानसिक दडपणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
अपघात नियंत्रणात !
२५ मार्चपासून 'टाळेबंदी' अस्तित्वात आली आहे. तेव्हापासून डिचोली तालुक्‍यात अपघातांचे प्रमाण बरेच नियंत्रणात आले आहे. किरकोळ अपघात सोडल्यास मागील एप्रिल महिन्याच्या ३० तारखेला डिचोलीतील शांतादुर्गा विद्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ घडलेला अपघात हा अपघात भयानक होता. ट्रकखाली दुचाकी आल्याने झालेल्या अपघातात जिवीतहानी टळली असली, तरी विर्डी-साखळी येथील दुचाकीचालक प्रकाश जल्मी याचे पाय निकामी झाले. टाळेबंदी लागू होण्याच्या दोन दिवस आधी 'जन संचारबंदी' असताना कारापूर-साखळी येथे मोटारगाडीची खडकाला धडक बसून झालेल्या अपघातात किरण मामलेदार या पोलिस उपनिरीक्षकाचा बळी जाण्याची घटना घडली.

संबंधित बातम्या