गोवा डेअरीचा ताबा त्रिसदस्यीय समितीने स्वीकारला

Dainik Gomantak
मंगळवार, 2 जून 2020

चौकशी हवीच, डेअरीच्या उत्कर्षासाठी काम करणार असल्याची दुर्गेश शिरोडकर यांची ग्वाही

फोंडा

कुर्टी - फोंडा येथील गोवा डेअरीच्या अध्यक्षपदाचा ताबा आज (सोमवारी) राज्य सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने स्वीकारला. गोवा डेअरीच्या अध्यक्षपदी राय - सांतेमळ येथील सातेरी दूध व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली असून कांपाल - पणजी येथील चार्टर्ड अकाऊंटंट यशवंत कामत तसेच राज्य सरकारच्या सहकार खात्याचे सहायक निबंधक अवित नाईक या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य आहेत.
गेल्या २९ डिसेंबरला गोवा सरकारच्या सहकार निबंधकांनी एका आदेशाद्वारे या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती गोवा डेअरीवर केली होती. या नियुक्तीनुसार अध्यक्षपदाचा ताबा दुर्गेश शिरोडकर यांनी स्वीकारला.
गेले सात महिने गोवा डेअरीवर प्रशासक म्हणून काम केलेले फोंड्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद खुटकर यांनी या त्रिसदस्यीय समितीकडे रीतसर ताबा दिला. यावेळी गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते उपस्थित होते.
अरविंद खुटकर हे फोंड्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून दाबोळी विमानतळ प्राधिकरणावर कोरोनासंबंधीच्या कामकाजाचाही त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण ताबा आहे. गोवा डेअरीच्या उत्कर्षासाठी ही त्रिसदस्यीय समिती वावरेल असा विश्‍वास व्यक्त करून आपण गेले आठ महिने गोवा डेअरीचे कामकाज हाताळले असून डेअरीची स्थिती सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. दूध उत्पादक व गोमंतकीय ग्राहकांच्या हितासाठी गोवा डेअरी नफ्यात येणे आवश्‍यक असल्याचेही खुटकर म्हणाले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सरकारनियुक्त गोवा डेअरीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी गोवा डेअरीसंबंधी योग्य ते निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली. गोवा डेअरीचा नव्यानेच ताबा घेतला असल्याने आधी डेअरीसंबंधीच्या आतापर्यंतच्या कामकाजाची पूर्ण माहिती करून घेणार असून डेअरीच्या उत्कर्षाबरोबरच दूध उत्पादकांच्या भवितव्याचा विचार करूनच योग्य निर्णय घेतले जातील, असे दुर्गेश शिरोडकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे गोवा डेअरीपासून फारकत घेऊन काही दूध उत्पादक सुमुलकडे गेले आहेत, त्यांना परत गोवा डेअरीकडे वळवण्यात येईल. मागे गोवा डेअरीत काय घडले त्याचा उजाळा न घेता दोषींवर कारवाई ही व्हायलाच हवी, पण गोवा डेअरीत नाविन्य आणण्याबरोबरच गोवा डेअरीचे दूध उत्पादन वाढवणे, दूध उत्पादकांना नफा मिळवून देणे व ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी पारदर्शक व्यवहार असेल, प्रशासन गतिमान करण्यावरही भर देण्यात येईल, असे नवनियुक्त गोवा डेअरीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी सांगितले. समितीचे अन्य सदस्य असलेले यशवंत कामत यांनी गोवा डेअरीचा आर्थिक व्यवहार, तर अवित नाईक यांनी कायद्याच्यादृष्टीने योग्य तो निर्णय घेण्यावर भर असेल, असे सांगितले.
दरम्यान, नवीन समितीने गोवा डेअरीचा ताबा घेतल्यानंतर लगेच डेअरीच्या विविध खात्यांचे अधिकारी तसेच अन्य संबंधितांशी चर्चा केली.

वादामुळे गोवा डेअरी झाली बदनाम..!
गेला बराच काळ गोवा डेअरी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गोवा डेअरीच्या एकंदरीत कामकाजाबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहेत. त्यातच गोवा डेअरीचे संचालक तसेच अधिकारीच एकमेकांवर शरसंधान करीत असल्याने दूध उत्पादकही संभ्रमात पडले आहेत. गोवा डेअरीतील खरेदी व्यवहार, भाडेपट्टीवर घेण्यात येणारी वाहने, कोणतीच कागदपत्रे नसताना चालवली जाणारी वाहने तसेच इतर विषयांवरून गोवा डेअरीचा विषय तापला होता. आता डेअरीवर दूध उत्पादकाचीच अध्यक्षपदी वर्णी लागल्याने दूध उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेष म्हणजे मागच्या आंदोलनात खुद्द दुर्गेश शिरोडकर यांनीही सहभाग घेतला होता.

पावणे दोन वर्षांत ४ प्रशासक!
गोवा डेअरीने आतापर्यंतच्या कार्यकाळात गेल्या पावणे दोन वर्षांत तब्बल ४ प्रशासक पाहिले. गेल्या ६ सप्टेंबर २०१८ ते आता ३१ मे २०१९ पर्यंतच्या काळात या चार प्रशासकांची नियुक्ती झाली. या चार प्रशासकांत दामोदर मोरजकर, संतोष कुंडईकर, डॉ. विलास नाईक व अरविंद खुटकर यांचा अनुक्रमे समावेश आहे. फक्त या कार्यकाळात १६ एप्रिल २०१९ ते १३ ऑगस्ट २०१९ या कालावधीसाठीच राजेश फळदेसाई हे दूध उत्पादकच्या अध्यक्षपदी होते. मात्र, गोवा डेअरीतील अंदाधुंदी, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर गेल्या पावणेदोन वर्षात गोवा डेअरीने अनेक स्थित्यंतरे बघितली. आता सरकार नियुक्त त्रिसदस्यीय समितीने डेअरीचा ताबा घेतला आहे.

संबंधित बातम्या