‘गोवा डेअरी’चा ताबा आता त्रिसदस्यीय समितीकडे

Dainik Gomantak
शनिवार, 30 मे 2020

गोवा डेअरीचे प्रशासक म्हणून अरविंद खुटकर यांची गेल्या १ ऑक्‍टोबरला सहकार निबंधकांनी नियुक्ती केली होती. त्यापूर्वी गोवा डेअरीचे प्रशासक म्हणून डॉ. विलास नाईक हे प्रशासकपदी होते. पण विलास नाईक हे निवृत्त झाल्यानंतर अरविंद खुटकर यांच्याकडे प्रशासकाचा ताबा देण्यात आला.

फोंडा

राज्य सरकारच्या सहकार खात्याकडून गोवा डेअरीवर प्रशासक म्हणून नवीन त्रीसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश आज (शुक्रवारी) सहकार खात्याचे निबंधक विकास गावणेकर यांनी काढला आहे. या त्रिसदस्यीय समितीत अध्यक्षपदी सांतेमळ राय सालसेत येथील सातेरी दूध व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष दुर्गेश मधुकर शिरोडकर असून समितीचे सदस्य म्हणून कांपाल - पणजी येथील चार्टर्ड अकाऊंटंट यशवंत कामत तसेच राज्य सरकारच्या सहकार खात्याच्या सहायक निबंधकाचा समावेश आहे.
आज (शुक्रवारी) या आदेशाची अंमलबजावणी झाली असल्याचे या आदेशात म्हटले आहे. गोवा डेअरीचे प्रशासक म्हणून अरविंद खुटकर यांची गेल्या १ ऑक्‍टोबरला सहकार निबंधकांनी नियुक्ती केली होती. त्यापूर्वी गोवा डेअरीचे प्रशासक म्हणून डॉ. विलास नाईक हे प्रशासकपदी होते. पण विलास नाईक हे निवृत्त झाल्यानंतर अरविंद खुटकर यांच्याकडे प्रशासकाचा ताबा देण्यात आला. अरविंद खुटकर यांच्याकडे फोंड्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा ताबा आहे. याशिवाय संजीवनीचाही ताबा आहे, त्यामुळे आता गोवा डेअरीच्या प्रशासकपदातून खुटकर यांना मोकळे करण्यात आले आहे.
गोवा डेअरीवरील आठ संचालकांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून अपात्र ठरवल्यानंतर संचालक मंडळ अल्पमतात आल्याने गोवा डेअरीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासक नियुक्तीवेळी राजेश फळदेसाई हे अध्यक्षपदी होते. मागच्या काही दिवसांत गोवा डेअरीसंबंधी संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक व अधिकाऱ्यांत ‘तू तू मै मै’ झाले होते. गोवा डेअरीसंबंधी एकमेकांवर दोषारोप केले होते. त्यामुळे गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांत संभ्रम निर्माण झाला होता. आता अरविंद खुटकर यांच्या गच्छंतीनंतर नवीन त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यामागचे राजकारण समजू शकले नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

भ्रष्टाचारामुळे गोवा डेअरी बदनाम!
गोवा डेअरीला सुमूलचे आव्हान समोर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दूध उत्पादकही संभ्रमित झाले आहेत. संचालक आणि गोवा डेअरीचे अधिकारीच एकमेकांवर आरोप करीत असल्याने गोवा डेअरी बदनाम झाली आहे. त्यातच आपल्या मर्जीतील लोकांना नोकऱ्या तसेच कंत्राटात मोकळीक दिली जात असल्याचा सरळ आरोप केला जात असल्याने गोवा डेअरीचे भवितव्य काय, असा सवालही दूध उत्पादकांकडून केला जात आहे. आता नवीन त्रिसदस्यीय समितीतून भ्रष्टाचारासंबंधी नेमकी चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही दूध उत्पादकांनी केली आहे

संबंधित बातम्या