२४ तासांत आणखी तिघांचे बळी

Tejshri Kumbhar
मंगळवार, 14 जुलै 2020

राज्‍यात कोरोना बळींची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्‍या २४ तासांत वास्‍को परिसरातील आणखी तिघा जणांचा बळी गेला. त्‍यामुळे एकूण बळींची संख्‍या १७ वर पोहोचल्‍याने धोका आणखी वाढला आहे. बळी गेलेल्‍या एकूण १७ रुग्णांपैकी १० रुग्ण वास्को परिसरातील आहेत. दरम्यान, आजच्या दिवसात राज्यात १३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ५३ रुग्णांची प्रकृती सुधारली. राज्यात एकूण १०२६ रुग्‍ण कोरोनाबाधित आहेत.  कोरोनाबाधित रुग्णांनी अडिच हजारांचा टप्‍पा पार केला आहे.

तेजश्री कुंभार, बाबुराव रेवणकर

पणजी, मुरगाव :

राज्‍यात कोरोना बळींची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्‍या २४ तासांत वास्‍को परिसरातील आणखी तिघा जणांचा बळी गेला. त्‍यामुळे एकूण बळींची संख्‍या १७ वर पोहोचल्‍याने धोका आणखी वाढला आहे. बळी गेलेल्‍या एकूण १७ रुग्णांपैकी १० रुग्ण वास्को परिसरातील आहेत. दरम्यान, आजच्या दिवसात राज्यात १३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ५३ रुग्णांची प्रकृती सुधारली. राज्यात एकूण १०२६ रुग्‍ण कोरोनाबाधित आहेत.  कोरोनाबाधित रुग्णांनी अडिच हजारांचा टप्‍पा पार केला आहे.

सडा - वेर्णादरम्‍यान ५०० जणांना कोरोना
मुरगाव तालुक्यातील वेर्णा पासून ते सडा पर्यंत ५०० हून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. तसेच मृतांची संख्या वाढू लागल्याने तालुक्यातील कोरोना स्थिती बिकट बनत चालली आहे. सोमवारी छोटा मांगोर येथील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकाचे निधन घरातच झाल्यानंतर त्याला चिखली इस्पितळात आणले व त्याची तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. वास्को परिसरात आतापर्यंत एकूण ९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. शनिवारी एकाच दिवशी तिघेजण मृत्युमुखी पडल्याने प्रशासनावर ताण आला होता. त्‍यानंतर सोमवारी पुन्हा दोघांचा मृत्‍यू झाल्‍याने स्थानिक प्रशासन बरेच हादरले आहे.
राज्यात आतापर्यंत १४ रुग्णांचे इस्पितळाच्या आत आणि ३ जणांचे इस्पितळाच्या बाहेर मृत्यू झाले आहेत. इस्पितळात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ८० वर्षांच्‍या पुढील तिघे, ७० ते ८० वयोगटातील चौघेजण ज्यांना मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार होते. ५० ते ६० वयोगटातील रुग्णांमध्ये एकट्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीला अतिताण, रक्तदाबाचा त्रास होता. ४० ते ५० वयोगटात दोघेजण असून यांना केमोचे उपचार सुरू होते. ४० पेक्षा कमी वय असणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र, या व्यक्तीला यकृताशी संबधित आजार होता. बाकीचे ३ रुग्ण इस्पितळाबाहेर मरण पावले असून त्यांनाही आजार असल्याची माहिती उघड झाली आहे.
राज्यातील सर्व खासगी इस्पितळाच्या आयसीयू वॉर्डमधील २० टक्के जागा कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिली. जी इस्पितळे या निर्णयाला सहमती दर्शविणार नाहीत, त्यांच्यावर सक्ती करण्यात येणार असून त्यांचे परवानेही रद्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य खात्याचे संचालक डॉ. ज्‍योस डिसा, कोविड इस्पितळाच्या प्रमुख डॉ. सुनंदा आमोणकर, डॉ. आयडा, डॉ उत्कर्ष बेतोडकर आदी उपस्थित होते. 
गुरुवारी ९ आंतरराज्‍य प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये २६ जणांना ठेवण्यात आले. १७७७ जणांच्‍या  लाळेचे नमुने घेण्यात आले, तर १५४६ जणांचे अहवाल हाती आले.  २८२६ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. 
रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १२५ रुग्ण, तर मांगोरहिल परिसरातील ७६ आणि मांगोरहिलशी संबंधित २९७ रुग्ण आहेत. केपेत १५, लोटलीत २८, नावेलीत ७, साखळीत २४, काणकोणात ८, राय येथे ३, कुंडई, नुवे, आगशी, करंजाळे, म्हार्दोळ, थिवी, कुजिरा सांताक्रूझ, बेतालभाटी, बांबोळी, खोर्ली, कुंभारजुवे, कोलवा येथे प्रत्येकी एक रुग्ण, मडगाव येथे १० रुग्ण, गंगानगर म्हापसा येथे ७, साखळीत २४, कामराभट टोंका येथे ६, मोतिडोंगर येथे ७, फोंडा ३६, वाळपईत २२, माशेलात २, उसगावात ५, गोवा वेल्हा येथे ५, बेतकीत ३, सांगेत ४, धारबांदोड्यात २२, मंडूर येथे ८, नेरुल २३ रुग्ण आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत. 

 

‘कोविड योद्धा’च कोरोनाच्‍या विळख्‍यात

राज्यात कोरोनाचा शिरकाव आता जनमानसात झाला आहे. ज्या डॉक्टरांनी राज्यातील कोरोना रुग्णांचा उपचार करण्यासाठी ‘कोविड’ इस्पितळाची घडी बसविली, ते कोरोना नोडल अधिकारी डॉ. एडविन गोम्स यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. डॉ. गोम्स यांना कोविड निर्मूलन केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनीही सदिच्छा दिल्या आहेत. 
कोविड इस्पितळात एकूण २२० खाटा सज्ज ठेवण्‍यात आल्‍या आहेत. यातील ६० खाटा अतिदक्षता विभागात आहेत. २० खाटा आयटीयू, १२ एनटीव्हीसाठी देण्यात आल्‍या आहेत. ८ खाटा लहान मुलांच्या उपचारासाठी आरक्षित ठेवण्यात आल्‍या आहेत. येथे २०० ऑक्सिजन श्वसन यंत्रणा, ८० व्हेंटिलेटर आणि २ डायलेसिस मशीन आहेत. आम्ही या विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना पीपीई आणि इतरही सुरक्षेच्या यंत्रणा दिल्या आहेत. सध्या इस्पितळातील ११० खाटांवर कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ४ जण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती डॉ. आयरा यांनी दिली. 

डिचोलीत पहिला बळी?
डिचोली तालुक्‍यातील पैरा-मये येथील एका ६४ वर्षीय राज्याबाहेरील व्यक्‍तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रविवारी रात्री उशिरा बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. मृत व्यक्‍तीच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींची उद्या (मंगळवारी) स्वॅब चाचणी करण्यात येणार आहे. मये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. सिध्दी कासार यांच्या सूचनेनंतर मयेचे सरपंच तुळशीदास चोडणकर आणि स्थानिक पंच विजय पोळे यांनी तशी कल्पना संबंधितांना दिली आहे.

वेर्णा औद्योगिक क्षेत्रात 
५४ पॉझिटिव्‍ह
वेर्णा येथील औद्योगिक क्षेत्रात आज एका दिवसात ५४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण एकाच कंपनीत कामाला होते. सध्या ही कंपनी बंद केली असून १४ दिवस येथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. येथील ५०० लोकांच्या चाचण्या आज करण्यात आल्या होत्या. तसेच १३ रुग्णांची नोंद कुंकळ्‍ळी येथे झाली 
आहे.

संबंधित बातम्या