गोव्यात एकाच दिवशी कोरोनाचे तीन बळी

Dainik Gomantak
रविवार, 12 जुलै 2020

राज्यात कोरोनाबाबतची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शनिवारी एका दिवसात तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोना बळींची संख्या आता १२ वर पोचली आहे. तिघेही वास्को येथील असून एका व्यक्तीचे वय ८० वर्षे तर दुसऱ्याचे केवळ ३१ वर्षे वय असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तिसरा व्यक्ती ७५ वर्षाचा असून तिघेही वास्को येथील आहेत

पणजी

राज्यात कोरोनाबाबतची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शनिवारी एका दिवसात तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोना बळींची संख्या आता १२ वर पोचली आहे. तिघेही वास्को येथील असून एका व्यक्तीचे वय ८० वर्षे तर दुसऱ्याचे केवळ ३१ वर्षे वय असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तिसरा व्यक्ती ७५ वर्षाचा असून तिघेही वास्को येथील आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यात ११७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले, तर ८१ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या राज्यात ९२८ इतके कोरोनाग्रस्त असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. सलग चौथ्या दिवशी १०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनामुळे ज्या तिघांचे बळी गेले, ते वास्कोमधील रुमडावाडा, बायना आणि खारेवाडा या भागातील आहेत. यातील ३१ वर्षीय व्यक्तीवर आज रात्री उशिरा वास्को येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली, बाकीच्या दोघांवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी १८ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये २९ जणांना ठेवण्यात आले. २९५२ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २००३ जणांचे अहवाल हाती आले असून यातील ३६३४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १११ रुग्ण आहेत, तर मांगोरहिल परिसरातील ६७ आणि मांगोरहिलशी संबंधित ३०५ रुग्ण आहेत. केपे येथे १७ रुग्ण, लोटली येथे ३० रुग्ण, नावेली येथे ६ रुग्ण, साखळी येथे ३२ रुग्ण, काणकोण येथे ८ रुग्ण तर राय येथे ३ रुग्ण, कुंडई, नुवे, आगशी, करंजळे, म्हार्दोळ, थिवी, कुजिरा सांताक्रूझ, बेतालभाटी, बांबोळी, खोर्ली, कुंभारजुवे, कोलवा येथे प्रत्येकी एक रुग्ण, मडगाव येथे ६ रुग्ण, गंगानगर-म्हापसा येथे ७ रुग्ण, साखळी येथे ३२ रुग्ण, कामराभाट टोंक येथे ७ रुग्ण, काणकोण येथे ७ रुग्ण, मोतीडोंगर येथे १३ रुग्ण, फोंडा येथे ३६ रुग्ण, वाळपई येथे २२ रुग्ण, माशेल येथे ५ रुग्ण, उसगाव येथे ८ रुग्ण, गोवा वेल्हा येथे ९ रुग्ण, बेतकी येथे ३४ रुग्ण, सांगे येथे ४ रुग्ण, पर्वरी येथे ४ आणि कुंकळी येथे १६, करमळी येथे ५ रुग्ण, धारबांदोडा येथे २० रुग्ण, मांडूर येथे १६ रुग्ण, नेरुल ११ रुग्ण आहेत. शिवाय राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.
कोरोनाग्रस्त असणारे पण गंभीर असणाऱ्या रुग्णांवर लवकरात लवकर प्लाझ्मा थेरेपी सुरू करण्यासाठी आता आरोग्य खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. जे लोक कोरोनामुक्त झाले आहेत, ते इतरांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तुम्ही जर पुढे येऊन प्लाझ्मा दान केला, तर ज्या लोकांचे आरोग्य कोरोनामुळे गंभीर आहे, त्यांना तुम्ही वाचवू शकता. त्यामुळे जे लोक कोरोना इस्पितळ आणि केअर सेंटरमधून बाहेर बरे होऊन घरी गेले आहेत. ज्यांनी १४ दिवसांचा कार्यकाळ काढला आहे, त्यांनी इतरांना वाचविण्यासाठी पुढे यावे आणि या संकटात प्लाझ्मा दान करून इतरांचे आयुष्य वाचवावे. प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त न काढता केवळ २५० मिली प्लाझ्मा काढण्यात येईल, असे आवाहन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी केले आहे.

आजपासून जागृती मोहीम
राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी सुरू करण्यासाठीचा सरकारने घेतला आहे. जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्यासाठीची जनजागृती मोहीम रविवारपासून म्हणजेच आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांनी पुढे येऊन इतरांचा जीव वाचविण्यासाठीचे आवाहन आम्ही लोकांना करणार असल्याचे मंत्री राणे यावेळी म्हणाले. आरोग्य खाते आणि राज्यातील डॉक्टर लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी झटत असल्याचेही मंत्री राणे यावेळी म्हणाले.

प्लाझ्मा थेरपीचे मशीन दाखल
प्लाझ्मा थेरपीसाठी वापरले जाणारे अफेरेसिस मशीन गोमेकॉत दाखल झाले आहे. हे मशीन सोमवारी किंवा मंगळवारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. या थेरेपीची सुरुवात करण्यासाठी दोन कोरोनामुक्त रुग्णांचा प्लाझ्मा स्वेच्छेने घेण्यात येणार आहे. गोमेकॉत असणाऱ्या अद्ययावत फ्रीझरमध्ये प्लाझ्माचे ४००० प्लाझ्मा पॅक ठेवण्यात आले आहेत. एम्समधील दोन प्लाझ्मा थेरेपी करणारे डॉक्टर लवकरच गोमेकॉत दाखल होणार आहेत. ५० डॉक्टर्स आणि ५० परिचारिका आता राज्यातील आरोग्य केंद्रांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी भरती करून घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली.

कोरोना संसर्ग स्थळे
सडा ८८
बायना १०७
कुडतरी ३२
नवेवाडे ८३
चिंबल ६३
झूआरीनगर १३९
मोर्ले २२
खारेवाडा ५२

सलग चार दिवस रुग्णांची
संख्या १०० च्या वर

बुधवार १३६
गुरुवार ११२
शुक्रवार १००
शनिवार ११७.

संबंधित बातम्या